प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिस यासारख्या अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी, बीएमसी (BMC) वेळोवेळी उंदीर (Rat) मारण्याचे अभियान राबवते. मात्र आता या कामासाठी बीएमसीकडे रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, म्हणूनच पालिकेने नोंदणीकृत एनजीओ आणि मनुष्यबळ संस्थांकडून अर्ज मागवले आहेत, जेणेकरून नागरी संस्थेला या कामामध्ये अतिरिक्त मदत मिळेल. नागरी संस्थेकडे दिवसाच्या शिफ्टसाठी सुमारे 130 कामगार आहेत आणि रात्रीच्या शिफ्टसाठी फक्त 27 आहेत.
दिवसा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतेही टार्गेट नाही, मात्र रात्रीच्या कर्मचाऱ्यांना रोज रात्री किमान 30 उंदीर मारण्याचे टार्गेट असते. विशेष म्हणजे, आउटसोर्स केलेल्या मनुष्यबळाला रोज रात्री किमान 100 उंदीर मारावे लागतात. याबाबत नागरी अधिकारी म्हणाले, ‘अनेक ना-नफा संस्थांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्ती आहेत. जर ते उंदीर मारण्याचे काम करण्यास तयार असतील तर ते चांगले पैसे कमवू शकतात. म्हणून, आम्ही स्वयंसेवी संस्थांना (उंदीर मारण्यात) सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.’
नागरी कर्मचार्यांव्यतिरिक्त, बीएमसी अशा कामासाठी खाजगी एजन्सीदेखील नियुक्त करते, ज्यासाठी प्रत्येक उंदीर मारल्याबद्दल 23 रुपये शुल्क आकारले जाते. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत नागरी कीटकनाशक विभागाने 2.66 लाख उंदीर मारले आहेत. साधारणपणे, विषारी अॅल्युमिनियम फॉस्फाईड वापरून उंदीर मारले जातात. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, कीटकनाशक विभागाने या वर्षी सप्टेंबरपर्यंत दररोज 976 उंदीर मारले आहेत, तर गेल्या वर्षी दररोज 900 उंदीर मारले गेले होते. (हेही वाचा: महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच बीएमसीच्या कर्मचा-यांसाठी रांगोळी स्पर्धा; जाणून घ्या डिटेल्स)
मेलेले उंदीर मोजणीसाठी प्रभाग कार्यालयात घेऊन गेल्यानंतर, ते प्रयोगशाळेत पाठवले जातात. उंदरांच्या संकटाचा सामना करण्यासाठी, बीएमसीने नागरिकांना त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि उरलेल्या अन्नाची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. पासून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.