पुणे (Pune) येथील ससून सर्वोपचार रुग्णालयात (Sassoon General Hospital Pune) असलल्या अतिदक्षता विभागात (Sassoon General Hospital ICU) दाखल रुग्णाचा उंदीर चावल्याने (Rat Bite) कथीत मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. उंदराने चावा घेतल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांतून झळकताच एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनही हादरुन गेले आहे. रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असला तरी, रुगणाचा मृत्यू मणक्याच्या दुखापतीमुळे झाल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे आली आहे. त्यामुळे रुग्ण तर दगावला पण त्याला खरेच उंदीर चावला का? याबाबत रुग्णालय प्रशासन शोध घेणार आहे. त्यासाठी प्रशासनाने एक समितीही स्थापन केल्याचे समजते.
नेमके काय घडले?
सागर दिलीप रेणुसे (वय-30) या रुग्णाचा 15 मार्च रोजी रात्री 10 वाजता अपघात झाला होता. अपघात झाला तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवत होता. अपघातादरम्यान गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार सागर नावाचा हा तरुण 16 मार्चरोजी रुग्णालयात दाखल झाला. त्या वेळी त्याची स्थिती अत्यंत गंभीर होती. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र, त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे 29 मार्च पासून त्याला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले. दरम्यान, त्याच्यावरील उपचार सुरु असतानाच 1 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास त्याच्या नातेवाईकांनी तक्रार केली की, सागर यास उंदीर चावला. त्याच्या चेहऱ्याचा बराचसा भाग उंदराने कुरतडला. दरम्यान, त्याच रात्री त्याचा मृत्यूही झाला, असे काळे म्हणाले. (हेही वाचा, Patient Died After Rat Bite In Sassoon Hospital: ICU मध्ये उंदीर चावला त्यामुळे रुग्ण दगावला? पुणे येथील ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना)
शवविच्छेदन अहवालात उंदीर चावल्याचा उल्लेख नाही
दरम्यान, उंदीर चावल्याने रुग्ण दगावला असल्याचा दावा रुग्णाच्या (सागर रेणुसे) नातेवाईकांनी केला असला तरी, त्याच्या शवविच्छेदन अहवालात वेगळेच कारण पुढे आले आहे. सागर याच्या मृतदेहाचे विच्छेदन ससून रुग्णालयामध्येच मंगळवारी (2 एप्रिल) सायंकाली करण्यात आले. या शवविच्छेदनाच्या अहवालात पुढे आले की, त्याचा मृत्यू हा मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाला आहे. विशेष म्हणजे मृतदेहावर कोठेही उंदीर चावल्याच्या खाणाखुणा आढळून आल्या नाहीत, असे रुग्णालय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी माहिती देताना म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबईच्या GT पाठोपाठ आता पुण्याच्या Sassoon Hospital मध्ये 'ट्रांसजेंडर स्पेशल वॉर्ड')
रुग्णाचे नातेवाईक आरोपांवर ठाम
शवविच्छेदन अहवालात उंदीर चावल्याचा उल्लेख नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले असले तरी, रुग्णाचे नातेवाईक मात्र आरोपांवर ठाम आहेत. उंदीर चावल्याची माहिती रुग्णाने स्वत: दिली असल्याचे नातेवाईकांचे म्हणने आहे. यावर नातेवाईकांचा दावा फेटाळून लावताना रुग्णालयाने म्हटले आहे की, रुग्ण सागर रेणुसे हा व्हेंटीलेटरवर होता. त्यामुळे तो बलू शकत नव्हता. दरम्यान, रुगणाला रेबीज प्रतिबंधक लस देण्याची शिफारस करण्यात आल्याचेही पुढे आले आहे.
उंदराचा चावा आणि रुग्णाचा मृत्यू या दाव्यावर बोलताना ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी सांगितले की, रुग्णाचा मृत्यू उंदीर चावल्याने झाला नाही. त्याचा मृत्यू हा मणक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाला आहे. शवविच्छेदन अहवालातही तशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी मात्र उंदीर चावल्यानेच रुग्णाचा मृत्यू झाल्याची लेखी तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. तसेच, या प्रकरणात नेमके काय घडले याबाबत माहिती घेतली जाईल.