Dhanbad News: उंदीर काय करु शकतो याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. तो शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस करतो आणि घरांमधील चिजवस्तू फस्त करतो हे सर्वांनाच माहिती. झारखंड पोलीसांना मात्र उंदीरमामांच्या नव्याच कृत्याची प्रचिती आली आहे. झारखंड राज्यातील धनाबाद पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार उंदरांनी चक्क 10 किलो गांजा आणि नऊ किलो भांग (Rats Eat Bhang) फस्त केली आहे. आहे की नाही गंमत? उंदरांनी गांजा (Rats Eat Marijuana) आणि भांग खाण्याचा पराक्रम केल्याची घटना अनेकांच्या भूवया उंचावण्यास कारण ठरु शकतो. पण, आता पोलिसच कोर्टामध्ये अशी माहिती देतात तर कदाचित त्यात तथ्य असूही शकते. नेमके काय आहे प्रकरण? घ्या जाणून
त्याचे झाले असे की, धनबाद पोलीसांनी शंभू अग्रवाल नावाच्या व्यक्ती आणि त्याच्या मुलास 14 डिसेंबर 2018 रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अंदाजे 10 किलोग्राम गांजा आणि नऊ किलोग्राम 'भांग' जप्त केली. जप्त केलेले पदार्थ एका गोदामात ठेवण्यात आले. प्रकरणाचा तपास सुरु झाला आणि आरोपींनाही कोर्टात हजर करण्यात आले. खटला सुरु झाला. (हेही वाचा, Rats Drank Liquor: पोलीस ठाण्यात ठेवलेली दारू उंदरांनी केली फस्त; पिंजरा लावून एका आरोपीला अटक; न्यायालयात केले जाणार हजर)
खटल्याच्या कामकाजादरम्यान सत्र न्यायाधीश राम शर्मा यांनी तपास अधिकारी जयप्रकाश प्रसाद यांना जप्त केलेली सामग्री पुरावा म्हणून सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, तपास अधिकारी असलेल्या पोलिसांनी आपण हा पुरावा कोर्टात सादर करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. कोर्टाने कारण विचारले असता, 'आरोपींकडून जप्त केलेले दोन्ही पदार्थ आपण गोतामात ठेवले होते. मात्र, हे पदार्थ उंदरांनी खाऊन टाकले. त्यामुळे हे पदार्थ कोर्टात दाखल करण्यास आपण असमर्थ आहोत', असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचे उत्तर ऐकूण कोर्टही अवाक झाले. कोर्टामध्ये तपास अधिकाऱ्याने 6 एप्रिल रोजी दाखल केलेल्या अहवालात सांगितले की, जप्त केलेला गांजा आणि भांग उंदरांनी नष्ट केले होते. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Sassoon Hospital Pune: रुग्ण दगावला पण उंदीर चावला की नाही? पुणे येथील ससून रुगणालय समिती करणार चौकशी)
पोलिसांनी कोर्टात दिलेल्या उत्तरानंतर शंभू आणि त्यांचा मुलगा यांचे वकील अभय भट्ट यांनी बचावातर्फे युक्तीवाद करताना सांगितले की, आपल्या आशिलांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. त्यांच्यावर जो आरोप आहे त्या आरोपाचा कोणताही पुरावा पोलीस न्यायालयात सादर करु शकत नाहीत. त्यामुळे आपले आशील पूर्णपणे निर्दोष आहेत. (हेही वाचा, Rats Feast On IRCTC Food Stall: रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फूड स्टॉलवरील अन्नावर उंदीर धावताना दिसले, व्हिडिओ व्हायरल (Watch Video))
दरम्यान, पाठिमागील काही दिवसांपासून उंदीर आणि त्यांचे प्रताप विविध राज्यांमध्ये चर्चेत आहेत. अलिकडेच पुणे येथील ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा उंदीराने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप झाला होता. ज्याची रुग्णालय प्रशासन एका समितीद्वारे चौकशी करणार आहे.