Ranjitsinh Disale यांचा दिलदारपणा, Global Teacher Prize च्या बक्षीसाची निम्मी रक्कम 10 Finalists सोबत वाटून घेणार
Ranjitsinh Disale | Photo Credits: Twitter/ ANI

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणार्‍या मानाच्या Global Teacher Prize साठी महाराष्ट्राच्या सोलापूर मधील Ranjitsinh Disale यांच्या नावाची काल घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इतका मानाचा पुरस्कार जिंकल्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बक्षीसाची निम्मी रक्कम त्यांच्यासोबत अंतिम फेरीत असलेल्या 10 फायनलिस्ट सोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजितसिंह यांना $1-million म्हणजेच अंदाजे 7 कोटीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकणार्‍या रणजीतसिंह डिसले यांच्यावर अजित पवार, तुकाराम मुंढे ते राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव; पहा ट्वीट्स

ग्लोबल टीचर पुरस्कार हा युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्याकडून दिला जातो. जगभरातील 140 देशातील 12 हजारांहून अधिक शिक्षकांची नावं या पुरस्कारासाठी विचाराधीन होती. त्यामध्ये भारताच्या आणि महाराष्ट्रातील सुपुत्राने बाजी मारली आहे. रणजित यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका भारतीयाला हा पुरस्कार जाहीर होत आहे.

ANI Tweet

ग्लोबल टीचर पुरस्काराची निम्मी रक्कम इतर देशातली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सोबतच टीचर इनोव्हेशन फंडसाठी वापरणार असल्याचं डिसले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भारतासोबतच इतर देशातील शिक्षण आणि शिक्षकांचा स्तर सुधारेल. तेथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी मदत होणार आहे.

रणजीत यांच्या कार्याची दखल स्थानिक पातळीवरदेखील घेण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते विविध उपक्रमांसोबत जोडले गेले आहेत. शिक्षण विकास मंचच्या 2010 मध्ये प्रकाशित झालेल्या "उपक्रम: वेचक-वेधक" या पुस्तकात रणजितसिंह डिसले यांचा "स्वयंशिस्तीतून आरोग्याच्या सवयी" आणि याच पुस्तकाच्या 2015 च्या सुधारित आवृत्तीत त्यांचा "पालक आणि सोशल मीडिया" हा लेख प्रकाशित झाला होता.