पुणे: शिवशाही बसच्या बेजबाबदार चालकामुळे 27 प्रवाशांचा जीव टांगणीला; दुर्घटना टळली मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
शिवशाही बस (Photo Credit: Facebook)

मद्यपान करुन शिवशाही बस चालवणाऱ्या चालकामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पुण्याहून उस्मानाबाद येथे जाणाऱ्या बसमध्ये काल रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. विशेष म्हणजे बसचे चालक, वाहक बसमधून खाली उतरले असताना एसटीचा मद्यपी चालक बसमध्ये चढला आणि त्याने बस चालवायला सुरुवात केली. हा चालक नशेत असल्याने त्याने पुण्यात सिमला ऑफिस चौकात बस भिंतीला धडकवली. (शिवशाही बस उलटली, दोन ठार, इतर प्रवासी जखमी; नाशिक-मुंबई-आग्रा हायवेवर अपघात)

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, या सर्व प्रवासात बसमधील 27 प्रवासी जीव मुठीत धरुन बसले होते. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवशाही बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बसचा चालक बस सुरु ठेवून बसमधून खाली उतरला. त्याचबरोबर कंडक्टरही बसमध्ये नव्हता. याचाच फायदा घेत मद्यपी चालक गाडीत चढला आणि त्याने ड्रायव्हरच्या सीटचा ताबा मिळत बस शिवाजीनगर एसटी स्थानकातून बाहेर काढली. (व्हिडिओ: शिवशाही बस जागेवरच पेटली, आलीशान गाडी जळून खाक)

ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मद्यपी चालक बस मधून उतरुन पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला पकडण्यात यश आले. हा एसटीचा चालक असून त्याने मद्यप्राशन केले होते, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही म्हणून प्रवाशी बचावले. अन्यथा शिवशाही बसचालक, कंडक्टरचा हा बेजबाबदारपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता.