Fire In Shiv Shahi Bus | (Photo courtesy: Facebook Live Video, Screenshots)

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (Maharashtra State Transport Board) शिवशाही बसने (एमएच १४ जीयू २३१०) अचानक पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. चालक आणि रस्त्यावरच्या सजग नागरिकांमुळे अग्निशमन दलाशी तातडीने संपर्क झाला आणि मोठी जीवित हानी टळली खरी. परंतू, शिवशाही बस ( Shivshahi Bus ) आणि अपघात हे समिकरणच आहे काय? असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील कासारवाडीजवळ (Kasarwadi) हा दूर्दैवी प्रकार रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये प्रवाशी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. पण, गाडीचे मोठे नुकसान झाले.

प्राप्त माहितीनुसार, एमएच १४ जीयू २३१० क्रमांकाची बस भोसरी सर्व्हिसिंग सेंटर मुक्कामी होती. रात्रीचा मुक्काम संपल्यानंतर रविवारी सकाळी ही बस भोसरीतून शिवाजीनगरच्या दिशेने निघाली. शिवाजी नगर बस बसस्थानकातून शिवाजी नगर ते श्रीरामपूर या प्रवासावर ही बस निघणार होती. दरम्यान, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर कासारवाडी येथे रस्त्यात बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालक पप्पू आव्हाड यांनी बस कशबशी रस्त्याच्या कडेला घेतली. घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. त्यांनी एबीसी पावडर असलेला सिलिंडर आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्याबाहेर गेल्याने नागरिकांच्या प्रयत्नांना यश आले नाही. दरम्यान, एका नागरिकाने अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही मिनिटात आग आटोक्यात आणली. (हेही वाचा, व्हिडिओ: पुणेकरांच काही खरं नाही, आगोदर होर्डिंग, आता थेट मेट्रोची भलीमोठी ड्रील मशीन भररस्त्यात कोसळली)

दरम्यान, बसला लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. खरेतर शिवशाही बस म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची रुबाबदार ओळख. खासगी कंपन्यांसोबतच्या स्पर्धेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी या बसची निर्मिती करण्यात आली . परंतू, बसची ओळख प्रवासी आणि जनमानसात अधिक दृढ होण्याऐवजी भलत्याच कारणासाठी ही बससेवा चर्चेत असते. कधी बसचा अपघात होतो. कधी बस रस्त्यात मध्येच बंद पडते तर, कधी चालती बस अचानक पेट घेते. त्यामुळे सेवेपेक्षा इतरच कारणांमुळे बससेवा चर्चेत असते.