पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: खेड आळंदी, चिंचवड, पिंपरी जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
पुणे जिल्हा मतदार संघ (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे पुणे (Pune). आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा (Congress-NCP) बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जायचा मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने (BJP) इथे खिंडार पाडले आहे. आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीने भाजप समोर फार मोठे आव्हान उभे केले आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड इथे यावेळी राजकीय उलथा पालथ झालेली पाहायला मिळत आहे. पुण्यात तब्बल 21 मतदार संघ आहेत. मागच्या विधानसभेमध्ये भाजपने इथे तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या पराभवानंतर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा आपली पकड घट्ट करण्यासाठी कंबर कसली आहे. चला पाहूया पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आणि लढती

खेड आळंदी (Khed Alandi) – सध्या या मतदारसंघात एकूण 9 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीने दिलीप मोहिते यांना उमेदवारी दिली आहे, शिवसेनेकडून सुरेश गोरे आणि भाजपकडून अतुल देशमुख निवडणूक लढवणार आहेत. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील शिरूर या विधानसभा मतदार संघात आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र शिवसेनेने हळू हळू इथे आपली पकड घट्ट केली. शिवसेनेकडून पहिल्यांदाच आमदार सुरेश गोंरे इथून  निवडून आले.

चिंचवड (Chinchawad) – पिंपरी चिंचवड हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. मात्र महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर इथले संपूर्ण चित्र पालटले. आता आघाडीमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेले आहेत तर युतीमध्ये पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला आणि चिंचवड व भोसरी मतदारसंघ भाजपला गेले आहेत. चिंचवड येथून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यावर पक्षाने अजून इथून कोणालाही पाठींबा दर्शवला नाही. सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात युतीकडून भाजपचे लक्ष्मण जगताप उभे आहेत. तर शिवसेनेचे पालिकेतील गटनेते नगरसेवक राहुल कलाटे अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. (हेही वाचा: विधानसभा निवडणुकीत जतना भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देईल: नरेंद्र मोदी)

पिंपरी (Pimpri) – आघाडीमध्ये पिंपरी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला आला आहे. राष्ट्रवादीने इथून आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून आमदार गौतम चाबुकस्वार उभे आहेत. यांच्यासोबत ज्यांना जागा मिळाल्या नाहीत असे सुलक्षणा धर, राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ, कॉंग्रेसचे मनोज कांबळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे भाजपकडून बंडखोरी करत अमित गोरखे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, भीमा बोबडे,  महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या 'आरपीआय'च्या चंद्रकांता सोनकांबळे यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात फार मोठी लढत पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.