कोरोना बाधित मुलाची आतडं प्रत्यारोपणाची (Intestine Transplant) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. महाड (Mahad) येथे राहणाऱ्या 10 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याच्या छोट्या आतड्यात मोठ्या प्रमाणावर गॅंग्रिन उद्भवले. त्यासाठी आतडं बदलण्याची गरज पडली. वडीलांनी आतडं दान करुन मुलाचे प्राण वाचवले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर तब्बल 3 महिन्यांनंतर शनिवारी त्याने पहिल्यांदा वरण-भाताचा आहार घेतला.
ओम घुले (Om Ghule) असे शस्त्रक्रिया झालेल्या मुलाचे नाव असून वडील संतोष यांनी त्याला तब्बल 200 सेमीचे लहान आतडे दान केले. ठाणे आणि पुण्यातील डॉक्टरांनी एकत्रितपणे ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. कोविड-19 ची लागण झाल्यानंतर Intestine Transplant शस्त्रक्रिया झालेला ओम हा भारतातील पहिला रुग्ण असल्याचा दावा करण्यात येत आहे. (Double Lung Transplant for Covid-19 Patient: हैदराबाद मध्ये कोरोनाबाधित रूग्णावर दोन्ही फुफ्फुसांच्या प्रत्यारोपण ऑपरेशन; भारतातील पहिलीच शस्रक्रिया)
ही शस्त्रक्रिया करण्यासाठी या मुलाला तीन शहरांत प्रवास करावा लागला. दरम्यान, गेल्या तीन महिन्यात त्याच्या 4 सर्जरीज आणि आतडं प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. जुलै महिन्यात ओम आणि त्याच्या वडीलांना कोरोनाची लागण झाली. महिन्याभरात ते दोघेही त्यातून बरे झाले. मात्र ओमच्या पोटात खूप दुखत होते. त्यामुळे पनवेल मधील एका रुग्णालयात त्याला 8-28 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आले. तिथे त्याच्या छोट्या आतड्यात कॉल्ट आणि गॅंग्रिन झाल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर आतडं प्रत्यारोपणासाठी त्याला ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
ओम याला ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल 4 नोव्हेंबर पर्यंत अॅडमिट करण्यात आले होते. दरम्यान, हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचारी ट्रान्सपॉन्ट सर्जरी करण्याचा परवानाच्या प्रतिक्षेत होते. त्यानंतर प्रत्यारोपणाचा परवाना असलेल्या पुणे येथील शाखेत ओमला हलवण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये ओमची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 तासांचा कालावधी लागला. वडीलांच्या शरीरातून 200 सेमीचं आतडं काढण्यासाठी 5 तास शस्त्रक्रिया सुरु होती. तर ओमच्या शरीरात ते आतडं प्रत्यारोपण करण्यासाठी 10 तास लागले.