Post-COVID Disease: पोस्ट कोविड बुरशीजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ, पुण्यात आढळले चार रुग्ण
Coronavirus In Maharashtra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हणजेच कोविड (COVID-19) संक्रमितांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. ही आनंदाची बाब असली तरी पोस्ट कोविड (Post-COVID Disease) आजारांचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बरे झालेल्यांमध्ये म्युकरमायकोसिस (Mucormycosis) सारखा आजार आढळून आला. त्यातूनही आपण बाहेर पडत असतान पाठिमागील काही महिन्यांपासून एक नवीनच आजार कोविड संसर्गातून बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये दिसत आहे. हा एक प्रकारचा बुरशीजन्य आजार आहे. पुणे शहरात या आजाराचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे.

आवश्यक ते सर्व उपचार योग्य रित्या घेऊन कोरोना संसर्गावर मात करुन बाहेर पडलेल्या पुण्यातील एका 66 वर्षीय व्यक्तीस साधारण एक महिन्यांनी त्रास जाणवू लागला. या व्यक्तीस सौम्य ताप, पाठ आणि कंबरदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांनी सुरुवातीस त्याला नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे आणि इतर काही आवश्यक उपचार केले. दरम्यान, त्या व्यक्तीचे एमआरआय स्कॅन केले. तेव्हा त्याच्या स्पॉन्डिलोडायसिटिस नावाच्या स्पाइनल-डिस्क स्पेसमध्ये गंभीर संसर्ग होऊन हाडांचे नुकसान झाल्याचे आढळले. तसेच, सदर व्यक्तीच्या हाडांवर एक प्रकारची बुरशी आढळून आली. (हेही वाचा, Fact Check: देशात विक्रमी कोरोना लसीकरण झाल्याच्या आनंदात सरकार देत आहे मोफत 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

प्रसारमाध्यमांनी डॉक्टरांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस ही बुरशी पाठीच्या क्षयरोगासारखी आहे. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या त्याचे निदान करणे खूप कठीण आहे. हा प्रकरणांमध्ये ही बुरशी कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या तोंडात आणि क्वचित रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये आढळून आली आहे. अशा प्रकारची बुरशी पाठिमागील तीन महिन्यांमध्ये चार रुग्णांमध्ये आढळून आली आहे. हे रुग्ण पुणे शहरातील आहेत. बुरशीच्या प्रजातींमुळे झालेल्या पाठीच्या कणात ऑस्टियोमायलाईटिसचे निदान करण्यात आले. भारतात यापूर्वी बरे झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये एस्परगिलस वर्टेब्रल ऑस्टियोमायलाईटिस आढळला नव्हता, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल संसर्गजन्य रोग तज्ञ परीक्षित प्रयाग यांनी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.