
महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यातील एका 20 वर्षीय तरुणावर त्याच्या वडिलांकडून पैसे (Extra Money) उकळण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या अपहरणाचा (Own Kidnapping) कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपी असलेला मुलगा 7 डिसेंबर रोजी घरातून निघून गेला होता. बराच काळ उलटून गेला तरी, तो परत आला नव्हता. त्यामुळे त्याबद्दलची तक्रार वडिलांनी पोलिसांच दिली होती. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन 8 डिसेंबर रोजी बेपत्ता व्यक्तीबद्दल गुन्हा दाखल केला. दरम्यान, वडिलांना त्यांच्या मुलाचा फोन आला, ज्यामध्ये तीन व्यक्तींनी अपहरण केल्याचा त्याने दावा केला. तसेच, सुटकेसाठी ते केवळ ₹30,000 ची खंडणी मागित असल्याचेही सांगितले. वडिलांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविण्यास सुरुवात केली.
खंडणीची रक्कम पाहून पोलिसांना संशय
बेपत्ता असलेल्या मुलाचे अपहरण झाल्याचा फोन कॉल आल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली आणि त्या दृष्टीकोनातूनही तपास सुरु केला. आरोपींनी खंडणीपोटी मागीतलेली रक्कम पाहून पोलिसांना संशय आला होता. तरीही पोलिसांनी वसई, विरार, नालासोपारा आणि आसपासच्या परिसरात कथित पीडिताचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार केली. विविध ठिकाणी कसून तपास केल्यानंतर आणि अखेर शनिवारी वसई फाट्यावर या व्यक्तीचा शोध लागला. (हेही वाचा, चंद्रपूर मध्ये शाळेला दांडी मारल्याने पालक रागावू नये म्हणून 10 वर्षीय मुलाने रचला अपहरणाचा बनाव; क्राईम शो मधून कल्पना)
स्वत:च्या अपहरणाचा बनाव
बेपत्ता व्यक्तीचा शोध तर लागला. पण, त्याचे अपहरण नेमके झाले कसे. आरोपी कोण होते. हा प्रकार घडलाच कसा? असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीतच होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तरुणाकडे चौकशी सुरु केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले. पोलीस तपासात पुढे आले की, बेपत्ता झालेल्या तरुणानेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता. त्याने आपल्या वडिलांकडे आर्थिक मदत मागितली होती. जी ती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे वडिलांकडून पैसे उकळण्याच्या नादात तरुणाने स्वत:च्या अपहरणाची कथा रचली आणि खंडणीसाठी वडिलांना QR कोडही पाठवला. (हेही वाचा, 16 वर्षीय मुलीने दहावीच्या बोर्ड परीक्षेचं दडपण घेत अपहरण झाल्याचं कुटुंब, पोलिसांना सांगितलं खोटं; पोलिस चौकशीमध्ये झालं उघड)
फसवणुकीचा गुन्हा दाखल
वालीव पोलिसांनी 20 वर्षीय तरुणास आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासही सुरु आहे. केवळ व्यक्तीगत फायद्यासाठी कुटुंबाला वेटीस धरणे तसेच, त्यामुळे शासकीय यंत्रणेचाही गैरवापर होणे असे त्याच्यावर आरोप असल्याचे समजते. आरोपीकडे अजूनही चौकशी केली जात असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या विचित्र प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.