Bombay High Court | (Photo Credits: ANI)

Mumbai: दोन आठवड्यांपूर्वी पत्नीचे अपहरण (Kidnapping) झाल्याचा दावा करणाऱ्या महिलेच्या पतीने याचिका दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महिलेला न्यायालयात हजर केले जाईल याची खात्री करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने प्रदीप राजेशकुमार गुप्ता यांच्या याचिकेवर सुनावणी करताना, सध्या उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या महिलेला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले.

प्रदीप राजेश कुमार गुप्ता यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा प्रेमविवाह झाला होता आणि ते दोन भिन्न जातीतील आहेत. गुप्ता यांची बाजू मांडणारे अधिवक्ता मुकेश गुप्ता यांनी न्यायालयासमोर सादर केले की, पूजा यादव यांचे लग्नानंतर पूजा प्रदिप गुप्ता नाव झाले. त्या लग्नानंतर अचानक गायब झाल्या. त्यामुळे पतीने पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्रष त्या न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

मुकेश गुप्ता यांनी न्यायालयासमोर सादर केले की त्यांच्या अशिलाची पत्नी दुसऱ्या जातीतील आहे आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यामुळे त्यांच्या लग्नाला आक्षेप घेतला. पूजाने प्रदीपसोबत पळून लग्न केल्याचे सांगितले.

दरम्यान, अतिरिक्त सरकारी वकील डॉ. अश्विनी टाकळकर यांनी खंडपीठासमोर माहिती दिली की, 'याचिकाकर्त्याच्या पत्नीशी फोनवरून संवाद साधला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ती सध्या उत्तरे प्रदेशमध्ये घरी आहे. तिने स्वतःच्या इच्छेनुसार तिथे प्रवास केला आहे.' दरम्यान, महिलेच्या कुटुंबीयांना नोटीस पाठवावी आणि सोमवारी या न्यायालयासमोर हजर करावे, जेणेकरून तेही आपले म्हणणे मांडू शकतील, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.