प्रतिकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

दहावीच्या परीक्षा (SSC Exam) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यंदा कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवरच विद्यार्थी पुन्हा ऑफलाईन परीक्षांना सामोरी जाणार आहेत. दरम्यान बोर्ड परीक्षेचं दडपण घेत एका 16 वर्षीय मुलीने थेट स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे. पोलिस चौकशीमध्ये तिचा खोटेपणा समोर आला आहे. या मुलीच्या स्वतःच्या खोट्या अपहरणाची कहाणी कुटुंबियांना आणि पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. मात्र पोलिसांना कोणताही पुरावा न सापडल्याने मुलीची उलट तपासणी घेण्यात आली आणि परीक्षेला घाबरून तिने हा प्रकार केल्याचं कबुल केले.

बदलापूरला राहणारी ही 16 वर्षीय मुलगी 10 वीत शिकत आहे. 23 फेब्रुवारीला ही मुलगी दुपारी घरातून बाहेर पडली. ट्रेनने बदलापूर -परळ प्रवास केला. नंतर घरी फोन करून आपल्याला चार जणांनी बेशुद्ध करत गाडीत टाकून नेल्याचं सांगितलं. नंतर आपणच त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतल्याचं तिने सांगितलं. मग घरच्यांनीही पोलिस स्टेशन गाठून दादर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. नक्की वाचा: Maharashtra Board Exams 2022: 10वी,12वी विद्यार्थ्यांच्या ताणतणाव व्यवस्थापनासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी जारी .

दरम्यान या अपहरणाची तक्रार बदलापूर पोलिस स्टेशन कडे वर्ग करण्यात आली. पण पोलिसांना पुरावे मिळत नसल्याने मुलीवरच त्यांचा संशय बळावला आणि तिची कसून चौकशी सुरू झाली. तेव्हा आपण खोटं बोलल्याची कबुली दिली.