महाराष्ट्रात आज दसरा (Dussehra) साजरा होत असताना विविध पक्षांचे राजकीय मेळावे पार पडत आहेत. एकीकडे आज राज्यातील युवा नेतृत्त्वाच्या फळीतील रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून कायमचं बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ट्वीट करत त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत. 'मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.' असं त्यांनी म्हटलं आहे.
निलेश राणे हे माजी खासदार आहेत. 2009 साली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. 42 वर्षीय निलेश राणे उच्च शिक्षित आहेत. वडील नारायण राणे यांच्याप्रमाणे निलेश राणे देखील स्पष्टवक्ते आहेत. निलेश यांचा भाऊ नितेश राणे आमदार आहेत. वडील नारायण राणे सध्या केंद्रात मंत्री असताना आणि भाऊ राज्याच्या विधिमंडळात असताना सक्रिय राजकारणापासून निलेश राणे दूरच होते. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण अनेकदा निलेश राणे सोशल मीडीयाच्या माध्यमातून विरोधकांवर तुटून पडलेले दिसून आले आहेत. ठाकरे विरूद्ध राणे वाद असो किंवा शरद पवारांना 'औरंगजेबाचा पुर्नजन्म' असल्याचं म्हणत टीका करणं अशा त्यांच्या रोखठोक आणि तिखट भूमिकांमुळे ते मागील काही वर्षात अनेकदा चर्चेमध्ये आले आहेत.
निलेश राणे ट्वीट
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 24, 2023
महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणूकीसाठी चाचपणी सार्याच पक्षांमध्ये सुरू झाली आहे. अशावेळी निलेश राणेंनी थेट राजकीय निवृत्तीची घोषणा केल्याने चर्चेला उधाण आले आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत बसलं आणि कोकणातही राजकीय गणितं बदलायला सुरूवात झाली. त्यामध्ये आता निलेश राणेंची अचानक झालेली राजकीय निवृत्तीची घोषणा पाहता ही कोणती राजकीय खेळी आहे याचे तर्क वितर्क राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाले आहेत.