Yuva Sangharsh Yatra News: शरद पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार आजपासून (24 ऑक्टोबर) युवा संघर्ष यात्रा सुरु करत आहे. विजयादशमी (2023) अर्थातच दसऱ्याचा (Dasara 2023) मुहूर्त साधून सुरु केलेल्या या यात्रेस पुणे येथील महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना अभिवादन करुन सुरुवात होणार आहे. फुले वाड्यातून ही यात्रा पुढे लाल महाल, बालगंधर्व मार्गे टिळक स्मारकला अकरा वाजता पोहोचेल. या ठिकाणी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे यात्रेला संबोधित करतील. त्यानंतरत महात्मा फुले स्मारक ते टिळक स्मारक मंदिरापर्यंत रोहित पवारांचा रोडशो होईल आणि मग या यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.
युवकांच्या प्रश्नासाठी जवळपास 800 किलोमीटर प्रवासाचे ध्येय रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने ठेवले आहे. ज्यामध्ये पेपरफुटी, कंत्राटी भरती, यांशिवाय बेरोजगारी, शिक्षणाचे प्रश्न असे युवकांना भेडसावणाऱ्या एक ना अनेक प्रश्नांवर भाष्य केले जाईल. साधारण 800 किलोमीटररची ही यात्रा 13 जिल्ह्यांतून प्रवास करेन. ती साधारण 45 चालेल आणि 7 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता नागपूर येथे होईल.
युवा संघर्ष यात्रा प्रवास मार्ग थोडक्यात
- पुणे येथील फुले वाड्यातून 24 ऑक्टोबर रोजी सुरुवात
- यात्रेचा एकूण प्रवास 45 दिवसांचा असेल
- पुण्यातील तुळापूर येथून येथून यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात
- काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव आदी प्रमुख ठिकाणी संघर्ष यात्रा आपला अवकाश व्यापेल.
- नागपूर येथे नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी युवा संघर्ष यात्रेचा समारोप
रोहीत पवार यांनी युवा संघर्ष यात्रेच्या उद्देशाबद्दल बोलताना सांगितले की, राज्यातील युवकांना विविध समस्या भेडसावत आहेत. त्यांना शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी यांसह इतरही अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या आडचणी सोडविण्याचे प्रयत्न मतदारसंघातून मी करत आलो आहे. मात्र, राज्यातीलही विविध तरुणांचे प्रश्न समान आहेत. त्यांनाही वाचा फोडणे आवश्यक आहे. त्यामुळे ते प्रश्न समजून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवाय आजचा तरुण राजकारणाच्या बाबतीत प्रचंड उदासीन आहे. राजकारणात येतो म्हणजे आपण काहीतरी चुकीचे करतो आहोत, असे त्याला वाटते आहे. त्यामुळे या तरुणाची राजकारण आणि समाजकारण याकडे बघण्याची दृष्टीही बदलायला हवी, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.