Sharad Pawar (Photo Credits: Twitter)

Satara Bypoll Elections 2019:   सातारा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे येत्या 21 ऑक्टोबर दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसोबत लोकसभा मतदार संघातही पोटानिवडणूक पार पडणार आहे. या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मैदानात उतरावं अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये झालेल्या बैठकीत काही नेत्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे. या बैठकीमध्ये जयंत पाटील यांचा देखील समावेश होता. 'छत्रपती' उपाधीचा मान ठेवा; उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर रोहित पवार यांची फेसबूक पोस्ट

राष्ट्रवादीला अलविदा करत उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यानंतर पवार कुटुंबीयांसह पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील उदयनराजेंवर टीका केली होती. निवडणूकीतील दगा फटका टाळण्यासाठी उदयनराजेंनीही विधानसभेसोबत लोकसभा पोट निवडणूक व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. तर काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना त्यांनी शरद पवार निवडणूकीच्या  रिंगणात उतरल्यास आपण माघार घेऊ असे बोलून दाखवले आहे. त्यामुळे आता पवार काय राजकीय खेळी खेळनार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

शरद पवार यापूर्वी सात वेळा लोकसभेचे सभासद होते. 78 वर्षीय शरद पवारांनी यंदाही नातू पार्थ पवारसाठी निवडणूकीमधून माघार घेतली होती. 2009 साली त्यांनी शेवटची लोकसभा निवडणूक लढवली होती. यंदा लोकसभेमध्ये त्यांचे 4 खासदार असून त्यापैकी 3 जण हे महाराष्ट्रातील आहेत.

सातारा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. अशावेळेस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या जवळच्या लोकांमधील एक उदयन राजे यांनी पक्षाला रामराम करणं आणि खासदारकीचा राजीनामा देणं हे जिव्हारी लागलं आहे.