Rohit Pawar (Photo Credits: Facebook/ Rohit Pawar)

महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणूका 2019 च्या पार्श्वभूमीवर आता राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये आयाराम वाढत आहेत. अशातच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे अनेकांना धक्का बसला आहे. शरद पवारांनी उदयनराजेंच्या मनधरणीसाठी विशेष प्रयत्नही केले होते मात्र हे सारे मागे सोडून उदयन राजेंनी पक्षांतून बाहेर पडणं हे अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांना खटकलं आहे. यामध्ये आता शरद पवार यांचा नातू रोहित पवार याचादेखील समावेश आहे. आज फेसबूक पोस्टच्या माध्यमातून रोहितने उदयनराजे यांच्या भाजपा पक्षप्रवेशावर टीका केली आहे. उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर NCP आमदार जीतेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया; शरद पवारांनी बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं म्हणत टीकास्त्र

 

Facebook Post

उदयनराजे भोसले हे केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार नव्हते तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज देखील आहेत. त्यामुळे सातारा सह महाराष्ट्रात त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला एक झालर आहे. दिल्लीमध्ये काल (14 सप्टेंबर) उदयनराजे यांचा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपा पक्षामध्ये प्रवेश झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले उपस्थित होते. 'उदयनराजे यांनी 'छत्रपती' या उपाधीचा किमान आदर ठेवावा. या उपाधीवर महाराष्ट्रातील नागरिक विश्वास ठेवतो,त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही तर ती उपाधी मला महत्वाची वाटते.' असं म्हणत उदयनराजेंवर रोहित पवार यांनी टीका केली आहे.

रोहित पवार हे देखील सक्रिय राजकारणामध्ये शरद पवारांसोबत असतात. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकी दरम्यान अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली होती. त्यावेळेसही अशाचप्रकारे सोशल मीडीयातून रोहित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. अनेक दिग्गज नेते युतीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडनूकीत कसा निभाव लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.