आमदार जितेंद्र आव्हाड (Photo Credits-Twitter)

सातारा (Satara) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वीच (Assembly Elections) आज भाजप (BJP) पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीत (Delhi) अमित शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी उदयनराजे भोसले यांनी पक्षप्रवेश केला आहे. तर उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती. पण शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. तसेच मोदी यांच्यावर विश्वास ठेवून यापुढे भाजप पक्षात काम करण्याची इच्छा ही उदयनराजे यांनी व्यक्त केली.

परंतु उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आव्हाड यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, शरद पवार साहेब तुम्ही उदयनराजे यांच्यावर मनापासून प्रेम केले. साताऱ्यामधील निकटवर्तीयांना तुम्ही दुखावले आणि सगळ्या गोष्टी सुद्धा सहन केल्यात. परंतु तु्म्हाला साहेब काय मिळाले असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचसोबत यशवंतरावांचा सातारा जिल्हा, शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.(दिल्ली: उदयनराजे भोसले यांचा अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा पक्षात प्रवेश)

आमदार जितेंद्र आव्हाड ट्वीट: 

उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी 1995 मध्ये उदयनराजे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेस त्यांना राज्यमंत्री महसूलमंत्री पद देण्यात आले होते. सध्या आगामी विधानसभा निवडूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजपा पक्षामध्ये आयारामांची संख्या वाढली आहे. यामध्ये उदयन राजेंसारख्या व्यक्तीमत्त्वाचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी कॉंग्रेससह शरद पवारांसाठी मोठा धक्का आहे.