Udayanraje Bhosale (Photo Credits: Twitter)

सातार्‍याचे माजी राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा आज (14 सप्टेंबर) भाजपा पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे. दिल्लीमध्ये त्यांचा अमित शहा यांच्या निवासस्थानी  भाजपामध्ये पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले देखील उपस्थित होते. आज मध्यरात्री 1च्या सुमारास आपला खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेप्रमाणे काम करत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून यापुढे काम करण्याची इच्छा यावेळेस उदयन राजे भोसले यांनी बोलून दाखवली आहे. तसेच हा प्रवेश निस्वार्थी  भावनेतून केल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांच्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे महाराष्ट्रात पक्षाला फायदा होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  (हेही वाचा: खासदार उदयनराजे भोसले भाजपात आल्यास आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना)

लोकसभा निवडणुकीत जे निकाल महाराष्ट्रात लागले होते, त्यापेक्षाही अधिक चांगले निकाल विधानसभा निवडणुकीत लागतील. असा विश्वास यावेळेस अमित शहा यांनी बोलून दाखवला. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी 1995 मध्ये उदयनराजे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेस त्यांना राज्यमंत्री महसूलमंत्री पद देण्यात आले होते. सध्या आगामी विधानसभा निवडूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजपा पक्षामध्ये आयारामांची संख्या वाढली आहे. यामध्ये उद्यन राजेंसारख्या व्यक्तीमत्त्वाचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी कॉंग्रेससह शरद पवारांसाठी मोठा धक्का आहे.

 

ANI Tweet

 

काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये भेट झाली होती. यावेळेस त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सारे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता सातार्‍याच्या रिक्त झालेल्या लोकसभा जागेवर पुन्हा निवडणूक होणार आहे.