नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: इगतपुरी, कळवण, चांदवड, दिंडोरी, देवळाली जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
नाशिक जिल्हा मतदारसंघ (Photo Credits: File Image)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सर्वच मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उठला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात स्टार प्रचारकांच्या सभेनंतर आता उमेदवार स्थानिक पातळीवर स्वतः जातीने प्रचारांवर भर देत आहेत. नाशिक शहरातील नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि देवळाली या चारही मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघ आहेत.  2014 साली पार पडलेल्या निवडणुकीमध्ये इथे राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण पूर्णतः बदलले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक औत्सुक्याची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर चला पाहूया जिल्ह्यातील मतदारसंघ आणि लढती

इगतपुरी (Igatpuri) – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव आहे. यंदाच्या विधानसभेसाठी इथून एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. चार अधिकृत पक्षांची लढत इथे पाहायला मिळणार आहे. शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार निर्मला गावित, काँग्रेसचे हिरामण खोसकर, मनसेने नाशिकचे नगरसेवक योगेश शेवरे व वंचित बहुजन आघाडीचे लकी (लक्ष्मण) जाधव हे विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

2014 साली माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या असलेल्या निर्मला गावित या कॉंग्रेसपक्षाकडून इथे विजयी ठरल्या होत्या. त्यांना शिवसेनेच्या शिवराम झोले यांनी कडवे आव्हान दिले होते.

कळवण (Kalvan) – नाशिक जिल्ह्यातील कळवण मतदारसंघ हा देखील महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी सप्तशृंगी देवीचे मंदिर इथे आहे. त्यामुळे इथे वर्षभर भक्तांची गर्दी राहते. तसेच 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळीही फक्त विकासाच्या मुद्द्यावर इथे निवडणुकीची लढाई पार पडणार आहे. माकपचे जीवा गावित हे इथले विद्यमान आमदार आहेत.

यंदा शिवसेनेकडून मोहन गांगुर्डे तर राष्ट्रवादीकडून नितीन पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

चांदवड (Chandwad) -  प्रत्येक निवडणुकीत चांदवड एक निर्णयक भूमिका बजावत आला आहे. 2014 मध्ये भाजप नेते डॉ. राहुल आहेर येथून आमदार म्हणून निवडून आले होते. इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर, इथे भाजपाने चार वेळा, राष्ट्रवादीने दोनदा आणि अपक्ष उमेदवारांनी एकदा निवडणुका जिंकल्या आहेत. यंदा पुन्हा एकदा भाजपने आहेर यांनाच तिकीट दिले आहे. तर कॉंग्रेसकडून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल उभे आहेत. अशा प्रकारे इथे दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

दिंडोरी (Dindori) – 2009 सालच्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली. हा मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहे. या परिसरात राष्ट्रवादीची पकड असूनही 2009 साली शिवसेनेचे धनराज महाले इथे निवडून आले होते. मात्र 2014 साली राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ विद्यमान आमदार झाले. यंदा शिवसेनेकडून गावित तर राष्ट्रवादीकडून पुन्हा नरहरी झिरवाळ निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

देवळाली (Devlali) – नाशिक जिल्ह्यातील हा मतदारसंघ घोलप कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. बबन घोलप यांनी तब्बल 5 वेळा इथून विजय मिळवला आहे. 2009 सालीही इथले आमदारपद घोलप कुटुंबांकडेच होते. पुढे 2014 साली शिवसेनेने बबन घोलप यांना शिर्डी मतदारसंघातून तिकीट दिले होते मात्र ऐनवेळी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामुळे बबन यांचे सदस्यत्व रद्द झाले. मात्र विधानसभेवेळी त्यांचे सुपुत्र योगेश घोलप शिवसेनकडून विद्यमान आमदार झाले.

यंदाही योगेश घोलप यांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. बाबुलाल अहिरे यांची कन्या व भाजपतून बंडखोरी करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवणाऱ्या सरोज अहिरे व मनसेचे सिद्धांत मंडाले यांचे आव्हान असणार आहे.

दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.