नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: बागलाण, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य येवला, सिन्नर जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
नाशिक जिल्हा मतदारसंघ (Photo Credits: File Image)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सर्वच मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उठला आहे.  नाशिक जिह्यात अनेक स्टार प्रचारकांनी आपल्या सभा घेतल्या. आता त्यानंतर उमेदवार स्थानिक पातळीवर स्वतः जातीने प्रचारांवर भर देत आहेत. नाशिक जिल्हा मतदारसंघातील काही मतदारसंघ धुळे जिल्ह्यात येतात. नाशि जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 साली पार पडलेल्या निवडणुकीमध्ये इथे राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या.  मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण पूर्णतः बदलले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक औत्सुक्याची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर चला पाहूया जिल्ह्यातील मतदारसंघ आणि लढती

बागलाण (Baglan) – धुळे जिल्ह्यातील हा मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहे. मागच्या निवडणुकीपासून या ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र सुरुवातीपासूनच बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबांमध्येही हा मतदारसंघ विभागला गेल्याचे दिसून येते. मागच्यावर्षी मोदी लाट असूनही राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण इथून निवडून आल्या होत्या. यंदाही राष्ट्रवादीने दीपिका यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे दिलीप बोरसे रिंगणात उभे आहेत.

मालेगाव बाह्य (Malegaon Outer) - नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य हा मतदारसंघ धुळे जिल्ह्यात येतो. या मतदारसंघात 76 गावांचा समावेश आहे. 2004 सालापर्यंत इथे हीरे घराण्याचे वर्चस्व होते मात्र त्यावेळी दादाजी भुसे यांनी त्यांचा पराभव केला. 2009 साली भुसे यांनी भुजबळांच्या मदतीने पुन्हा एकदा इथे विजय मिळवला. हा पराभव जिव्हारी लागल्याने हिरे यांनी राजकीय संन्यास घेत नाशिकला मुक्काम हलवला. 2014 सालीही दादाजी भूसेच इथले विद्यमान आमदार झाले. यंदा पुन्हा एकदा शिवसेनेने दादाजी भुसे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर कॉंग्रेसच्या तुषार शेवाळे यांचे आव्हान असेल.

मालेगाव मध्य (Malegaon Central) – मुस्लिमबहुल हा मतदारसंघ धुळे जिल्ह्यात येतो. सध्या इथे कॉंग्रेसचे असिफ शेख विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ जनता दलाचे सर्वेसर्वा निहाल अहमद यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र 1999 साली विद्यमान महापौर रशीद शेख यांनी त्यांचा पराभव केला. यंदा पुन्हा एकदा कॉंग्रेसकडून असिफ शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून दिपाली वारुळे रिंगणात आहेत.

येवला (Yeola) – महाराष्ट्रातील पैठणीसाठी प्रसिद्ध असलेला हा मतदारसंघ. सध्या छगन भुजबळ इथले विद्यमान आमदार आहेत. छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास जरी मुंबईमधून सुरु झाला असला तरी, येवला येथील आमदार झाल्यावर त्यांना स्थिरता आणि प्रसिद्धी मिळाली. 2004 सालापासून ते इथले आमदार आहेत. मागच्यावेळी त्यांनी शिवसेनच्या संभाजी पवार यांचा पराभव केला होता. यंदाही राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा शिवसेनचे संभाजी पवार उभे आहेत.

सिन्नर (Sinnar) – नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून सिन्नरकडे पहिले जाते. या मतदारसंघ भाजप-शिवसेनचा बालेकिल्ला आहे. सध्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे इथले विद्यमान आमदार आहेत.या मतदारसंघात वंजारी समाजाची मते फार महत्वाची आहे. यंदा शिवसेना-भाजपा युतीचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.