
काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरषदेच्या अमरावती मंतदारसंघात (Amravati Mlc Election) निकाल फिरविण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये देण्याची तयारी सुरु होती, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, आपल्याला ही माहिती मिळताच आपण थेट कमिशनरना कॉल करुन माहिती दिली. तसेच, असे काही घडल्यास आपली नोकरी घालवली जाईल, असा इशाराही देण्यात आल्याचा दावा पटोले यांनी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
नाना पटोले यांनी दावा केला की, अमरावतीचा निकाल फिरविण्यासाठी अशी काही तयारी असल्याची माहिती देण्यासाठी आपल्याला आयबीतील एका मित्राचा फोन आला होता. या मतदारसंघात लिगाडे जिंकले होते. परंतू, त्यांना तो निकाल जाहीरकरता येत नव्हता. मी लिगाडे यांना विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच बाहेर पडायला सांगितले होते. काही ठिकाणी दबाव टाकावा लागतो, असेही पटोले म्हणाले.
वाचकांच्या माहितीसाठी असे की, विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. त्यांनी पहिल्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. दरम्यान, पटोले यांनी पुढे सांगितले की, आयबीतील मित्राचा फोन आल्यानंतर आपल्याला रात्रभर झोप आली नव्हती. काय करावे या विचाराने मी अस्वस्थ होतो. मात्र, जो राग होता तो निघून गेला आता आनंद असल्याची भावनाही पटोले यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, Nana Patole On PM: नाना पटोलेंनी घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार, म्हणाले - संसदेत ते पान टपरीवर असल्यासारखे बोलत होते)
अमरावती येथून धीरज लिंगाडे यांचा आश्चर्यकारक विजय झाला. तर भाजपच्या रणजित पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. भाजपसाठी त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. धीरज लिंगाडे यांनी प्रतिस्पर्धी डॉ. रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा 3 हजार 368 मतांनी पराभव केला. धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 मते प्राप्त झाली, तर डॉ. रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते प्राप्त झाली. अतिशय काट्याची टक्कर झालेल्या या मतदारसंघाची मतमोजणी 30 तास सुरु होती.