Coronavirus (Photo Credits: PTI)

सध्या महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही या विषाणूबाबत लस सापडली नसल्याने लोकांना आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्वीकार करुन, त्यामाध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम 15 सप्टेंबर 2020 पासून राबविण्यात येणार आहे.

संपूर्ण राज्यभरात ही मोहीम राबविली जाणार असून, कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण साधणे, हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक हे महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून, म्हणजेच घरोघरी जाऊन लोकांचा ताप आणि प्राणवायू पातळी तपासणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, 'कोविड-19'चे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे यासारख्या बाबी राबविल्या जाणार आहेत. एकूण कालावधी दरम्यान साधारणपणे दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. (हेही वाचा: कोरोना विषाणू संकटात लग्न करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाचा नवा नियम; पोलिसांकडे सादर करावे लागणार लग्नाचे Video Recording)

या मोहिमेद्वारे लोकांना कोरोना विषाणूसोबत जगायला शिकणे व त्यासाठी काही नियम व मार्गदर्शक सूचना यांचे पालन करणे याबाबत मार्गदर्शन केले जाईल. आता यासाठी बीएमसीने (BMC) वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्तरावर काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

वैयक्तिक स्तरावर –

  • मास्कचा सदैव उपयोग करावा. मास्क काढून ठेवू नये.
  • सॅनिटायझरची लहान बाटली सातत्याने सोबत बाळगावी. त्याचा गरजेनुसार उपयोग करत रहावा.
  • हातांची नियमितपणे स्वच्छता राखावी. साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवावेत.
  • स्वच्छ हातरुमाल बाळगावा. सर्दी, खोकला असल्यास स्वच्छ मास्क, रुमाल यांचा सातत्याने उपयोग करावा.
  • जेवताना एकाच भांड्यात किंवा पातेल्यात पदार्थ घेण्याऐवजी ते आवश्यकतेनुसार एकदाच ताटात घ्यावेत.
  • जेवताना मौन ठेवावे किंवा कमीत कमी बोलावे.
  • जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्त पदार्थ असावेत.
  • पुरेसा व योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम/योग/प्राणायाम आदीद्वारे प्रतिकारशक्ती टिकवून ठेवावी.

    पहा बीएमसी ट्वीट -

    कौटुंबिक स्तरावर –

  • कुटुंबात वावरताना, कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्वांचे सुचनांचे अनावधानाने कोणाकडून उल्लंघन होत असल्यास, ते एकमेकांच्या लक्षात आणून द्यावे.
  • शक्य असेल तेथे प्राणवायू पातळी मोजण्यासाठी उपकरण (ऑक्सीमीटर) ठेवणे.
  • शक्य असेल तेथे थर्मामीटर/थर्मल स्क्रिनिंग गन ठेवा.
  • कुटुंबात एकत्र सोबतीने जेवायला बसताना समोरासमोर न बसता एका बाजूला एक याप्रमाणे बसावे.
  • घरातील प्रत्येक सदस्याने दररोज स्वच्छ कपडे परिधान करावेत. न धुता कपड्यांचा पुन्हा वापर करु नये.
  • भ्रमणध्वनी सारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू कुटुंबातील सदस्यांनी एकमेकाकडे घेऊन/अदलाबदली करुन वापरु नयेत. अशा वस्तू देखील योग्यरित्या स्वच्छ राहतील, याची काळजी घेणे आवश्य्क आहे.
  • बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे आदी स्वच्छ धुवून ठेवावेत. नंतरच त्याचा आहारात समावेश करावा, अशा काही सूचना आहेत.

सामाजिक स्तरावर –

  • सोसायटी/वसाहतीमधे वावरताना प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक असावे
  • सोसायटी/वसाहतीमध्ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा.
  • सोसायटीमध्ये कडीकोयंडा, कठडे, रेलिंग, लिफ्ट, पार्किंग अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे
  • लिफ्टमध्ये प्रवास करताना कागदाने लिफ्टची बटणे द्बावीत व नंतर ते कागद कचऱ्याच्या डब्यात टाकावेत.

शेवटी बीएमसीने दुकाने किंवा मॉल्स, कार्यालयांमध्ये आणि प्रवास करताना कशी काळजी घ्यायची याबाबतही नियम सांगितले आहेत.