कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णसंख्येच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्हा तर संक्रीय रुग्णांच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे. अशात लॉक डाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत सरकारने लग्नामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढवली आहे. आता पुणे जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात लग्नासाठी नवीन नियम व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रशासनाने असे म्हटले आहे की, लग्नात सामाजिक अंतर ठेवले पाहिजे. तसेच लग्नाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग (Wedding Video Recording) स्थानिक पोलिसांना सादर करणे गरजेचे आहे. तसेच लग्नात आलेल्या लोकांची यादीही लग्नानंतर पाच दिवसांत पोलिसांना द्यावी लागणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. सतत वाढत्या कोविड-19 च्या प्रकरणांमुळे पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या आठवड्यात नवे परिपत्रक काढले. याबाबत देशमुख म्हणाले, 'सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ 50 लोक लग्नाला येऊ शकतात. या 50 लोकांमध्ये नातलगांपासून ते बँड, पुजारी आणि केटरर्सपर्यंतच्या लोकांचा समावेश असावा. तसेच लग्नाच्या हॉलमध्ये वातानुकूलन यंत्रणेची परवानगी नसणार.’
शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाते की नाही याची पाहणी करण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरील पोलिस, तलाठी व गाव पातळीवरील सरकारी अधिकाऱ्यांना सभागृहांना भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. लोक एकमेकांच्या शेजारी बसू शकत नाहीत अशा सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. लग्न किंवा रिसेप्शन दरम्यान कमीतकमी सहा फूट अंतर ठेवले पाहिजे. लोकांचे मास्क घालणे अनिवार्य असेल आणि थुंकणे सक्तीने निषिद्ध आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत आढळले 485 नवे COVID-19 चे रुग्ण, तर मृतांचा एकूण आकडा 186 वर)
परिपत्रकानुसार केवळ 50 लोकांना लग्नात उपस्थित राहण्याची परवानगी आहे. पुजारी, व्हिडिओग्राफर्स, केटरर्स आणि इतरांना लग्नाच्या हॉलमध्ये परवानगी असेल. मॅरेज हॉलच्या मालकांना एक नोंदणी करावी लागेल, ज्यामध्ये लग्नात सामील असलेल्या लोकांची नावे आणि त्यांच्या सह्या असतील. जिल्हा प्रशासनाने मॅरेज हॉलच्या मालकांना सॅनिटायझर आणि वॉशरूमजवळ साबण ठेवणे व वॉशरूम वारंवार स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत.