Mumbai Trans Harbour Link (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर धावणाऱ्या पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवला. अशाप्रकारे मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत मुंबई ते मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. या बसमध्ये एमटीएचएलचे अभियंते आणि कर्मचारी होते. ट्रान्स हार्बर लिंकद्वारे मुंबई आणि मुख्य भूभाग यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुकर करण्यात आली आहे. सुमारे 22 किमी लांबीच्या या सहा पदरी पुलाच्या बांधकामामध्ये सुमारे 16.5 किमी लांबीचा सागरी पूल आणि जमिनीवर 5.5 किमी मार्गिका बांधण्यात आली आहे.

या समुद्री पुलावर मुंबईतील शिवडी आणि शिवाजी नगर व नवी मुंबईतील चिर्ले जवळील राष्ट्रीय महामार्ग 4बी येथे इंटरचेंज असेल. हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असेल. हा प्रकल्प नोव्हेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3+3 मार्गिका 2 आपात्कालीन मार्गिका) पुलाचा समावेश आहे. (हेही वाचा: Dangerous Buildings: नवी मुंबई येथे 524, तर ठाण्यात 4,297 धोकादायक इमारती; महापालिकेने जारी केली यादी)

प्रकल्पाचे फायदे-

  • नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास.
  • प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पार्ट यांचे दरम्यान वेगवान दळणवळण शक्य.
  • मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-गोवा महामार्ग यांमधील अंतर सुमारे 15 किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत
  • मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार.

    प्रकल्पाची वैशिष्ट्ये-

  • हा जगातील 10 वा आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल असेल.
  • या पुलाद्वारे भारतात प्रथमच ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा परिचय झाला आहे.
  • सुमारे 500 बोईंग 747 विमानांच्या वजनाइतका म्हणजेच सुमारे 85 हजार मेट्रीक टन ऑयोट्रॉपीक स्टील चा प्रकल्पात वापर.
  • प्रकल्पात वापरण्यात आलेल्या रीइन्फोर्समेंट स्टीलचे एकूण वजन (1,70,000 MTon) आयफेल टॉवरच्या वजनाच्या 17 पट आहे.
  • या पुलासाठी वापरलेले कॉंक्रिट हे स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये वापरल्या गेलेल्या प्रमाणापेक्षा जवळपास सहा पट आहे.
  • वापरलेल्या पाइल लाइनरची एकूण लांबी (30 किमी) बुर्ज खलिफाच्या उंचीच्या 35 पट आहे.
  • पृथ्वीच्या व्यासाच्या 4 पट म्हणजेच सुमारे 48 हजार किमी लांबीच्या प्रिस्ट्रेसींग वायर्सचा वापर

मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणीदरम्यान केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र वाहनाने प्रवास केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहनाचे सारथ्य केले.

दरम्यान, 22 किमी लांबीच्या प्रकल्पातील सर्व काँक्रीटच्या सुपरस्ट्रक्चर स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे, एक विशेष आणि आव्हानात्मक काम पूर्ण होत आहे. सद्य:स्थितीत स्थापत्य कामांची सर्वसाधारण भौतिक प्रगती इतकी 94% असून सर्वसाधारण आर्थिक प्रगती 93% इतकी आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण या प्रकल्पाचे भूमिपूजन करणारे आणि पुढे हा प्रकल्प पूर्णत्वास जावा यासाठी सर्वतोपरी पाठबळ देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असे देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.