Senior journalist Dinu Ranadive | (Photo Credits: YouTube)

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे (Senior journalist Dinu Ranadive) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मुंबई (Mumbai) येथील दादर (Dadar) परिसरात असलेल्या निवसस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1956 साली त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. 1956 त्यांनी महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालीक सुरु केले. तिथून त्यांच्या पत्रकारीतेस सुरुवात झाली. दिनू रणदिवे (Dinu Ranadive) यांच्या मृत्यूमुळे प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनेकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. दिनू रणदिवे यांचे पत्रकारीतेतील स्त्रोत (सोर्स) अत्यंत तगडे होते. त्यामुळे त्यांच्या बातम्या, लेख नेहमीच वादळी आणि अन्यायावर प्रहार करणारे असत. त्यांनी उघडकीस आणलेला सिमेंट घोटाळा प्रचंड गाजला. सिमेंट घोटाळ्याबाबत केलेल्या बातमीदारीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

भारतातील एक प्रमुख पत्रकार अशी दिणू रणदिवे यांची ओळख होती. चिंचणी या डहाणू जवळील एका मध्यवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. लहानपणापासूनच दिनू रणदिवे चळवळी होते. त्यांच्यावर राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी रुईया महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. या काळात ते समाजवादी पक्षाच्या युवा चळवळीत ते कार्यरत होते.

उल्लेखनिय असे की नामवंत पत्रकार, लेखक अरुण साधू यांच्या प्रचंड गाजलेल्या 'सिंहासन' या कादंबरीवर त्याच नावाने (सिंहासन) हा चित्रपट आला. या कादंबरी असलेले आणि चित्रपटात साकारलेले 'दिगू टीपणीस' हे पात्र लेखकाने दिनू रणदिवे यांच्यावर प्रेरीत होऊनच लिहिले होते, असा दावा अनेकांनी केला आहे. सिंहासन चित्रपटातील दिगू टीपणीस हे पात्र अभिनेते निळू फुले यांनी साकारले होते.

दिनू रणदिवे यांनी पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवला. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आणि कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्यासोबत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशोक पडबिद्री यांच्या नियतकालीतून त्यांनी पत्रकारितेस सुरुवात केली. दिनू रणदिवे यांनी आपल्या संबंध पत्रकारितेच्या आयुष्यात नेहमी दलित, आदिवासी आणि गरीब, दबलेल्या पिचलेल्या समूहाची बाजू घेतली. मानवता आणि मानवी मुल्ये हा त्यांच्या पत्रकारितेचा पाया होता.