MNS Workers Protest For Mumbai Local: 'मुंबई डबेवाला असोशिएशन' चा मुंबई मध्ये मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला बिनशर्त पाठिंबा
Mumbai Dabbewala | (Picture Credit: Wikimedia Commons)

मुंबईमध्ये लोकल प्रवासासाठी सामान्यांनाही परवानगी मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आज आक्रमक झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरात आज (21 सप्टेंबर) सविनय कायदेभंग आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याला आता 'मुंबई डबेवाला असोशिएशन' (Mumbai Dabbewala Association) कडूनदेखील बिनशर्त पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. मागील 2 महिन्यांपासून मुंबईच्या डबेवाल्यांनादेखील प्रवास करण्याची मुभा द्या अशी मागणी जोर धरत होती. मात्र त्याला रेल्वे प्रशासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. डबेवाल्यांना न लोकल प्रवासाची परवानगी दिली ना ना डबेवाल्यांची सेवा अत्यावश्यक मानून लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली. अशा परिस्थितीमध्ये आता मुंबईचा डबेवाला असोसिएशन आज मनसे कडून पुकारण्यात आलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाला त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. MNS Workers Protest For Mumbai Local: मुंबईत सामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी मनसे चं सविनय कायदेभंग आंदोलन; संदीप देशपांडे यांनी केला विनापरवानगी रेल्वे प्रवास

मुंबई हळू हळू पुर्व पदावर येत आहे काही शासकीय, निमशासकीय, कार्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत ज्या कार्यालयात शक्य आहे तेथे डबेवाले सायकलवर जेवणाचे डबे पोहचवत आहेत. परंतु जो पर्यंत लोकल सेवा बहाल होत नाही तो पर्यंत डबेवाला आपली सेवा पुर्ण क्षमतेने देऊ शकत नाही. रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा बहाल करण्या बाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मनसे प्रमाणे “ मुंबई डबेवाला असोशिएशन “ ला लोकल ने प्रवास करून सविनय कायदेभंग करावा लागेल. केंद्र सरकार आणी रेल्वे प्रशासनाने आमची अडचण समजून घ्यावी व डबेवाल्यांची सेवा आत्यावश्क सेवा मानून डबेवाल्यांना लोकलने प्रवास करू देण्यात यावा अशी डबेवाला असोसिएशनची आग्रही मागणी आहे.

दरम्यान आज मध्य रेल्वेने मनसे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकार्‍यांनी रेल्वे प्रवास केला आहे. तर ठाण्यामध्ये मात्र अविनाश जाधव यांनी ठाणे ते मुलुंड प्रवासाची मागणी करताच त्यांना रोखण्यात आलं आहे. सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. मनसेची आग्रही मागणी आहे की रेल्वे प्रवासासाठी SOP जारी करत सामान्यांनादेखील त्यामधून प्रवासाची परवानगी द्यावी. यामुळे मोठ्या प्रमाणात लागणारा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

मागील 6 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे मुंबई डब्बेवाल्यांचंं आर्थिक गणित विस्कटलं आहे. त्यांच्या मदतीसाठी काही एनजीओ पुढे आल्या आहेत. तर पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांनी इतर व्यवसाय स्वीकरले आहेत.