Sandeep Deshpande (Photo Credits: Facebook)

मागील 6 महिन्यांपासून कोरोनाशी सामना करणारे मुंबईकर आता त्याच्या सोबत जगण्याचा प्रयत्न करत आहे. अशामध्ये पूर्वीप्रमाणे जनसामान्यांचे आयुष्य सुरळीत व्हावं याकरिता मुंबई लोकल आता सामान्यांसाठी देखील सुरू करा अशा आग्रही मागणीसाठी मुंबई मध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) कार्येकर्ते सविनय कायदेभंगाच्या तयारीत आहेत. मात्र मनसेच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मात्र शहरात रेल्वे स्थानकांमध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे. नवी मुंबई मध्ये वाशी स्थानकाबाहेरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र मनसेच्या संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी लोकलने प्रवास केला आहे. आता त्यांच्यावर कारवाई काय होते याकडे लक्ष लागले आहे. तर ठाणे शहरामध्येही कडक बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुंबईमध्ये अद्याप सामान्यांना मुंबई लोकलचा वापर प्रवासासाठी करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. याच कायद्याचा या भंग करत मनसे कार्यकर्ते लोकलचा प्रवास करणार आहेत. या सविनय आंदोलनच्या पार्श्वभूमीवर अनेक मनसैनिकांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे, मात्र तरीही मनसे आंदोलनावर ठाम आहे.

मुंबई लोकल ही शहराची लाईफलाईन समजली जाते. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आता खाजगी आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचार्‍यांची उपस्थिती हळूहळू वाढवली जात आहे. मात्र त्या तुलनेत पर्यायी वाहतूकसेवा आपल्याकडे उपलब्ध नाही. बेस्ट, एसटी बस, खाजगी वाहनं रस्त्यावर उतरवण्यात आली आहे. मात्र ती वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेकांचा वेळ प्रवासात जात आहे. सध्या खाजगी बॅंका, सरकारी कर्मचारी, कोर्टातील वकील, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी,  स्पर्धा परीक्षा, अंतिम वर्षाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पत्रकार केवळ यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईत पोलिसांनी कलम 144 विस्तारत शहरामध्ये संचारबंदी पुन्हा कडक केली आहे. या कलमा अंतर्गत नागरिकांना रस्त्यावर एकत्र जमण्यावर परवानगी नाही. सध्या विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची चौकशी करून पोलिस त्यांच्यावर कारवाई करत आहे.