पावसाळ्यातील मुंबईची (Mumbai) परिस्थिती जगजाहीर आहे. या काळात सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात होते, रस्ते जलमय होतात, गटारी तुंबतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. दरवर्षी बीएमसी (BMC) शहरातील मान्सून पूर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. आता मान्सूनपूर्व मुदतीच्या पाच दिवस आधी शहर आणि उपनगरातील 505 रस्त्यांपैकी केवळ 11 रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार, इतर 494 रस्त्यांचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे.
पूर्ण झालेले सर्व 11 रस्ते पश्चिम उपनगरातील आहेत. यामध्ये मालाडमध्ये सात, गोरागावमध्ये तीन आणि वांद्र्यात एक आहे. रिटेंडिंगमुळे आणि भविष्यातील नुकसान कमी करण्यासाठी सर्व रस्त्यांखाली युटिलिटी केबल डक्ट टाकण्याच्या निर्णयामुळे या गोष्टीसाठी विलंब झाला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे पावसाळ्यात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जे रस्ते अर्धवट आहेत ते पुढील काही दिवसांत तात्पुरते दुरुस्त केले जातील.
दुसरीकडे पावसाळा तोंडावर येऊनही नवी मुंबई परिसरात अजूनही रस्त्यांच्या खोदाईचे काम सुरु आहे. पावसाळ्यामध्ये शहरात पाणी साचू नये म्हणून 15 मे पूर्वी रस्ते खोदाई करण्याचे काम कंत्राटदाराला पूर्ण करावे लागते. मात्र 15 मे नंतरही रस्ते खोदाई चालू आहे. आता हे खोदाई करण्यात आलेले रस्ते तात्पुरते भरण्यात येणार आहेत. (हेही वाचा: मराठवाड्यातील फक्त 7 शहरांतील रहिवाशांनाच मिळते रोज पाणी; काही ठिकाणी तर 15 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा)
दरम्यान, महाराष्ट्रात झालेल्या एकूण रस्ते अपघातांपैकी जवळजवळ 45 टक्क्यांहून अधिक रस्ते अपघात मुंबईमध्ये घडले आहेत. राज्यात झालेल्या एकूण 19,383 अपघातांपैकी 8,768 अपघात मुंबईत झाले. ही धक्कादायक आकडेवारी या वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल महिन्यातील आहे. यासाठी मुख्यत: मेट्रो रेल्वे काम, रस्ते बांधणी, ड्रेनेज सुधारणा इत्यादींसह शहराभोवती सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे, खराब रस्ते, रस्त्यांमधील बॅरिकेड्स कारणीभूत आहेत.