Mumbai 2nd Sero Survey Results: मुंबईतील दुसर्‍या सेरो सर्व्हेनुसार झोपडपट्टीमध्ये कोरोना संसर्ग खालावला तर इमारतींमध्ये 2% ने वाढ
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

मुंबई मागील सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्याचा आणि त्याचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान हे कोरोना व्हायरसविरुद्ध छुपं युद्ध असल्याने अनेकांना आपला कोरोना व्हायरससोबत संपर्क आला आणि त्यावर मात करून आपण बाहेरही आलो याची माहिती देखील नाही. पण आरोग्य यंत्रणा सध्या मुंबईमध्ये काही ठराविक वॉर्ड्समध्ये जाऊन सेरो सर्व्हेच्या माध्यमातून अंदाजे किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे याची माहिती घेत आहे. दरम्यान सध्या दुसर्‍या सेरो सर्व्हेचा अहवाल मुंबई महानगर पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबईच्या दुसर्‍या सेरो सर्व्हेनुसार, झोपडपट्टी भागातील कोरोना संसर्ग पहिल्या अहवाल्याच्या तुलनेत कमी झाला आहे तर इमारतींमध्ये तो 2% वाढला आहे.

गुरूवार (1 ऑक्टोबरच्या) रात्री बीएमसीने दुसर्‍या सेरो सर्व्हेचा अहवाल प्रसिद्ध करताना दिलेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीमधील नमुन्यांमध्ये अ‍ॅक्टिबॉडीज कमी प्रमाणात आढळल्या आहेत. तर इमारतींमध्ये हे प्रमाण आता 18% पर्यंत पोहचलं आहे. पहिल्या सेरो सर्व्हेमध्ये इमारतींमध्ये हे प्रमाण 16% होते. जुलै महिन्यात पहिला सेरो सर्व्हे झाला होता तेव्हा झोपडपट्टीमध्ये 57% अ‍ॅन्टिबॉडीज आढळल्या होत्या आता हे प्रमाण 45% पर्यंत खाली आले आहे. Mumbai Coronavirus Update: मुंबईमधील झोपडपट्टी भागात 57 टक्के लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग, झोपडपट्टी नसलेल्या भागात फक्त 16 टक्केच संक्रमित लोक- Sero Survey.

मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धामध्ये आर उत्तर (बोरिवली), एम पश्चिम (मानखुर्द, गोवंडी) तर एफ नॉर्थ भागात दुसरा सेरो सर्व्हे झाला होता. दरम्यान दोन्ही सर्व्हेमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये थोडे अधिक असल्याचं म्हटलं आहे. तसेच कालांतराने कोरोनावर मात केलेल्यांच्या शरीरात अ‍ॅन्टिबॉडीजचे प्रमाण कमी झाल्याचं समजलं आहे. अजूमही अ‍ॅन्टिबॉडीज आपल्याला पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकतात का? याचा ठोस पुरावा मिळालेला नाही.

मुंबईमध्ये सेरो सर्व्हे मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि नीती आयोग यांच्या संयुक्त प्रयत्नाने केला जातो. सध्या मुंबई ही देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे.