Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दिल्लीच्या सीरो सर्वेच्या (Sero Survey) अहवालानंतर आता बीएमसीने (BMC) मुंबई (Mumbai) मध्ये केलेल्या सीरो सर्व्हे चा अहवाल समोर आला आहे. या सर्वेक्षणानुसार 57 टक्के कोरोना व्हायरसचा संसर्ग मुंबईतील झोपडपट्टी (Slums) भागात झाला आहे. झोपडपट्टी नसलेल्या भागात हा संसर्ग फक्त 16 टक्केच आहे. बृहनमुंबई महानगरपालिकेने तीन नगरपालिका प्रभागांमधील 6,936 लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की, झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण झालेल्यांपैकी 57 टक्के लोकांमध्ये सेरोप्रिव्हलेन्स (Seroprevalence) होता. झोपडपट्टी नसलेल्या भागात ही संख्या खाली येऊन 16 टक्के झाली आहे.

या सर्वेक्षणाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, झोपडपट्टी भागात गर्दी आणि बरेच लोक एकाच शौचालयाचा वापर करत असल्याने कोरोना होण्याचा धोका इथे वाढला आहे. या पाहणीत असे आढळले आहे की, झोपडपट्टी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या किमान 40 टक्के लोकांना हे संक्रमण झाले आहे. या सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा संसर्ग जास्त झाला आहे. या सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की, झोपडपट्टी वस्तींमध्ये संक्रमणाचा धोका वाढला असला तरी कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण येथे खूपच कमी आहे.

या सर्वेक्षणाशी संबंधित एका वरिष्ठ डॉक्टरांनी असे म्हटले आहे की, मृत्यु दर कमी होण्याच्या कारणांमध्ये एक महत्वाचे करण म्हणजे, झोपडपट्टी वस्तीतील लोकसंख्येचा एक मोठा भाग हा तरुण वर्ग आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या जवळपास 7000 लोकांपैकी कोणाचीही कोरोनासाठीची आरटी-पीसीआर चाचणी झाली नव्हती. म्हणजेच एकतर या लोकांमध्ये संसर्गाची लक्षणे नव्हती किंवा त्यांच्यात अगदी सौम्य लक्षणे असावीत. दहिसर, चेंबूर आणि माटुंगा येथे गेल्या दोन आठवड्यात हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. (हेही वाचा: दिल्लीमध्ये 47 लाख लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कात, लोकांमध्ये दिसली नाहीत लक्षणे; Sero survey मधून समोर आले धक्कादायक सत्य)

बीएमसीने नीती आयोग आणि टीआयएफआर (TIFR) यांच्यामार्फत हे सेरो सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात झोपडपट्टी आणि झोपडपट्टी नसलेल्या वस्तीतील समान लोकांचा समावेश होता. त्याचप्रमाणे या सर्वेक्षणात दहा वर्षांच्या मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अशा सर्व वयोगटातील लोकांचा समावेश होता.