महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या तुकाराम सानप नामक एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. कामाचा पगार वेळेत न मिळाल्याने या कार्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तुकाराम सानप हे एसटी महामंडळाच्या बीड आगार (Beed ST Depot) येथे चालक पदावर कार्यरत होते. पाठिमागील काही महिन्यांपासून वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांसमोर घर कसे चालवायचे आणि जीवन कसे जगायचे हा प्रश्न आहे. या आधीही अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश घटना या आर्थिक समस्यांमुळे घडल्याचे आढळून येते.
पाठीमागील काही महिन्यांपासून कामाचे वेतन न मिळाल्याने आर्थिक स्थिती फारच ढसळली होती. त्यामुळे ताण आल्याने आणि तो सहन न झाल्याने तुकाराम सानप यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे. आत्महत्येपूर्वी (सोमवार) सानप यांनी नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडले. दैनंदिन कामानुसार बसच्या फेऱ्या पूर्ण केल्या. त्यानंतर सायंकाळी ते घरी आले. त्यानंतर त्यांनी बीड शहरात असलेल्या अंकुश नगर इथल्या राहत्या घरी गळफास घेतला. (हेही वाचा, ST Bus Swept Away in Yavatmal Video: यवतमाळ जिल्ह्यात एसटी बस पूराच्या पाहण्यात वाहून गेली; एकाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश, उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील घटना)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तत म्हटले आहे की, सानप यांची घरची परिस्थीती इतकी खालावली होती की, पाठिमागील 15 दिवसांपूर्वी सानप यांच्या घराचा विजपूरवठा खंडीत करण्यात आला होता.त्यांच्या घरातील किराणा संपला होता. सात तारखेला पगार होईल, अशी सानप यांना अटकळ होती. मात्र, तसे घडले नाही. पगार झालाच नाही. त्यामुळे आगोदरच चिंतेत असलेले सानप अधिकच नैराश्येत गेले. त्याची परिणीत आत्महत्त्येत झाली.
सानप यांच्याप्रमाणेच सुभाष शिवलिंग तेलोरे नामक एका एसटी बस चालकानेही सप्टेंबर महिन्यात आत्महत्या केली होती. उभ्या असलेल्या बसमध्येच गळफास घेत तेलोरे यांनी आत्महत्या केली होती. तेलोरे हे कर्जबाजारी होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्या वेळी सांगण्यात येत होते.