ST Bus Swept Away in Yavatmal Video: यवतमाळ जिल्ह्यात एसटी बस पूराच्या पाहण्यात वाहून गेली; एकाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश, उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील घटना
ST Bus Swept Away in Yavatmal | (Photo Credit: Twitter)

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील उमरखेड (Umarkhed) तालुक्यातील दहागाव (Dahagaon) येथे प्रवाशांनी भरलेली एसटी बस (ST Bus) पुराच्या पाण्यात वाहून गेली (ST Bus Swept Away in Yavatmal) आहे. ही घटना आज (मंगळवार, 28 सप्टेंबर) सकाळी साडेआठ वाजणेच्या सुमारास घडली. पूराच्या पाण्यात एसटी घालण्याचे नसते धाडस चालकाने केले. ज्यामुळे बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात आला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली आहे. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, या बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे.

स्थानिक नागरिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, बसमध्ये एकूण 10 ते 12 प्रवासी होते. प्रवाशांच्या संख्येची पुष्टी होऊ शकली नाही. बस पूरात वाहून गेल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पट्टीच्या पोहणाऱ्या नागरिकांनी पाण्यात उड्या घेऊन नागरिकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत एका नागरिकाला वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे. काही प्रवाशांनी पुराच्या पाण्याच्या प्रवासाहसोबत वाहताना झाडांचा आधार घेतल्याचे समजते. (हेही वाचा, Maharashtra: रायगड येथे पुराच्या पाण्यात एसटी बस घालणे आले अंगलट, चालकासह वाहकाचे निलंबन)

दरम्यान, गुलाब चक्रीवादळ प्रभाव दाखवताना दिसत आहे. गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतो आहे. प्रामुख्याने बीड, अकोला, औरंगाबाद याठिकाणी पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो आहे. अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे.

व्हिडिओ

व्हिडिओ

औरंगाबाद जिल्ह्यात बानोटी, वरठाण, घोसला परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. अकोला आणि नांदेड जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने सकल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी संपर्क तुटल्याची माहिती आहे. प्रामुख्याने बुलडाणा – चिखली मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. पैनगंगा नदीला पूर आला आहे. येळगाव धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुरखीबाई वागणे 24 वर्षीय महिलेचा मृत्यू मुसळधार पावसामुळे झाला आहे. ही घटना विवरे खुर्द येथे घडली. तर सोनाली बारेला यांच्या मुलीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. सोनाली या विटनेर येथील रहिवासी आहेत.