राज्यात हळू हळू थंडीची (Cold) तीव्रता वाढू लागली आहे. आणखी काही दिवसांनी राज्यातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी जाणवू लागेल. यंदाचा हिवाळा (Winter), म्हणजेच साधारण 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, हा पुणे आणि मुंबईसाठी गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित हिवाळा (Most Polluted Winter) ठरला आहे. याउलट, दिल्लीने या कालावधीमध्ये 2019 पासूनचा आतापर्यंतचा सर्वात कमी प्रदूषित हिवाळा अनुभवला आहे. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR)-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी (IITM) च्या डेटामधून ही माहिती उघड झाली आहे.
या वर्षी 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत मुंबई, पुणे व दिल्ली अशा तिन्ही शहरांमधील सरासरी प्रदूषक PM10 आणि PM2.5 कॉन्संट्रेशनने नेमून दिलेल्या पातळीचा भंग केला असला तरी, आकडेवारीनुसार दिल्लीत PM2.5 ची पातळी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 23% कमी झाली आहे. IITM-SAFAR च्या शास्त्रज्ञांनी TOI ला सांगितले की, दिल्लीमध्ये बांधकाम आणि इमारती पाडण्याच्या कामांवर बंदी यांसारख्या अनेक उपायांमुळे या हिवाळ्यात प्रदूषणाची सरासरी पातळी कमी होऊ राहिली असावी.
15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशमधील एनसीआर जिल्हे आणि राजस्थानमधील सक्रिय आगीच्या संख्येत घट झाली आहे. IITM-SAFAR डेटावरून असे दिसून आले आहे की, या वर्षीच्या हिवाळ्यात आतापर्यंत, पुण्याचे सरासरी PM10 कॉन्संट्रेशन 103 ug/m3 होते, जे मागील वर्षी याच कालावधीत 82 ug/m3 होते आणि 2020 मध्ये 103 ug/m3 होते. शहराचे सरासरी PM2.5 कॉन्संट्रेशन 2021 मधील 51 ug/m3 आणि 2020 मधील 66 ug/m3 च्या तुलनेत, या वर्षाच्या कालावधीत 80 ug/m3 वर गेले. (हेही वाचा: Cyclone Mandous: देशावर मंदोस चक्रीवादळाचे संकट; महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता)
आणखी एका आयआयटीएम शास्त्रज्ञाने सांगितले की, या हिवाळ्यात पुणे आणि मुंबईत तुलनेने शांत वारे राहिले. यामुळेही शहरांमधील प्रदूषणाची पातळी वाढली असावी. दिल्लीतील वाऱ्याचा वेग जास्त असल्याने तेथील प्रदूषकांचा प्रसार होण्यास मदत झाली असावी. शास्त्रज्ञांनी सांगितले की, दिवाळीनंतर पुण्यात तापमान खूपच कमी होते, ज्यामुळे अनेक दिवस खराब हवेची गुणवत्ता वाढली. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून दमटपणा होता, त्यामुळे प्रदूषक साचण्यास मदत झाली आहे.