Cyclone | Image Used For Representational Purpose (Photo Credits: Wikimedia Commons)

बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले मंदोस चक्रीवादळ (Cyclonic Storm Mandous) तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीकडे सरकत आहे. वादळामुळे या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा अपेक्षित आहे. धोक्याची भीती लक्षात घेता एनडीआरएफ, नौदल आणि इतर संघटनांना तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रावर या वादळाचा तसा खास काही परिणाम होणार नसला तरी, या वादळामुळे दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

माहितीनुसार, 8 आणि 9 डिसेंबर रोजी तामिळनाडूमधील चेन्नईसह सर्व किनारपट्टी भागात जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये 8 डिसेंबरसाठी 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आणि 9 डिसेंबरसाठी 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी तयारीचा आढावा घेतल्यानंतर सांगितले की, चक्रीवादळामुळे होणारी जीवित आणि मालमत्तेची हानी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या वादळामुळे महाराष्ट्रातील कोकणात 8 आणि 9 डिसेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. चक्रीवादळ मंदोस हे गेल्या 6 तासांत 12 किमी प्रतितास वेगाने जवळपास पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आणि दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर केंद्रस्थानी राहिले. हे कराईकलच्या 390 किमी पूर्व-आग्नेय आणि चेन्नईच्या आग्नेय 480 किमी अंतरावर आहे. हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची आणि पुढील 6 तासांत त्याची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. (हेही वाचा: भारत लवकरच करू शकतो मानवाला सहन न होणाऱ्या उष्णतेचा सामना; World Bank च्या अहवालात धक्कादायक माहिती)

हे वादळ 9 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत आपली तीव्रता कायम ठेवेल आणि उद्या ती कमी कमी होत जाईल. हे वादळ उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पुद्दुचेरी-श्रीहरिकोटा ओलांडण्याची शक्यता आहे. 09 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास महाबलीपुरमच्या आसपास 65-75 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 85 किमी पर्यंत जाईल.