प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

गेल्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Waves) हजारो लोकांचा बळी घेतला आहे. आता या उष्णतेच्या लाटा भयावह वेगाने वाढत आहेत आणि अशा तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करणारा भारत हा लवकरच जगातील पहिला देश असेल, जिथे मानवी सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे उष्णता असेल. एका नव्या अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. ‘भारताच्या कूलिंग सेक्टरमध्ये हवामान गुंतवणुकीच्या संधी’ (Climate Investment Opportunities in India's Cooling Sector) या जागतिक बँकेच्या अहवालात असे म्हटले आहे की, देश तुलनेने उष्ण उन्हाळा अनुभवत आहे, जो लवकर सुरू होतो आणि जास्त काळ टिकतो.

अहवालात असे म्हटले आहे की, ‘एप्रिल 2022 मध्ये, भारताला अकाली उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला, ज्यामुळे सामान्य जीवन ठप्प झाले. यावेळी राजधानी नवी दिल्लीचे तापमान 46 अंश सेल्सिअसवर पोहोचले. मार्च महिन्यात तापमानात अभूतपूर्व वाढ झाली आणि तो इतिहासातील सर्वात उष्ण मार्च महिना म्हणून उदयास आला.’ तिरुवनंतपुरम येथे केरळ सरकारच्या भागीदारीत जागतिक बँकेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय 'इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स' बैठकीत हा अहवाल जारी केला जाईल.

अहवालात अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे की, लवकरच भारतातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता ही मानवाकडून सहन करण्यास सक्षम असलेली मर्यादा ओलांडेल. त्यात पुढे म्हटले आहे की, ‘ऑगस्ट 2021 मध्ये आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या सहाव्या मूल्यांकन अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की भारतीय उपखंडात येत्या दशकात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतील.’

अहवालानुसार, ‘G20 क्लायमेट रिस्क ऍटलसने 2021 मध्ये देखील चेतावणी दिली होती की कार्बन उत्सर्जन जास्त राहिल्यास 2036 ते 2065 दरम्यान संपूर्ण भारतातील उष्णतेच्या लाटा 25 पट जास्त राहण्याची शक्यता आहे. भारतातील वाढत्या उष्णतेमुळे आर्थिक उत्पादकता कमी होऊ शकते, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘भारतातील 75 टक्के कर्मचारी म्हणजे सुमारे 38 कोटी लोक अशा ठिकाणी काम करतात जिथे त्यांना उष्ण हवामानात राहण्याची गरज आहे.

अनेकवेळा त्यांना संभाव्य जीवघेण्या तापमानात काम करावे लागते. उष्णतेच्या ताणामुळे उत्पादकतेवर परिणाम झाल्याने, 2030 पर्यंत जागतिक स्तरावर 80 दशलक्ष नोकऱ्या गमावल्या जातील आणि त्यातील 34 दशलक्ष नोकऱ्या भारतात गमावल्या जातील. अहवालानुसार, दक्षिण आशियाई देशांमध्ये जास्त श्रमाच्या कामांवर उष्णतेचा सर्वाधिक परिणाम भारतात दिसून आला आहे, जेथे एका वर्षात उष्णतेमुळे 101 अब्ज तास वाया जातात. (हेही वाचा: सर्वसामान्यांना पुन्हा झटका, आरबीआय रेपो दरात 0.35 बेसिस पॉइंट्सने वाढ)

दरम्यान, जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनी मॅकिन्से अँड कंपनीच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, वाढत्या उष्णता आणि आर्द्रतेमुळे कामगारांच्या नुकसानीमुळे दशकाच्या अखेरीस भारताला त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) 4.5 टक्के किंवा US$ 150-250 अब्ज डॉलर्सचा फटका बसू शकतो.