कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) काळात भरमसाठ वीज बिलावरुन मनसेने (MNS) राज्य सरकारवरविरुद्ध आक्रमक पवित्रा धारण केला होता. तसंच वीज बिल माफ करण्याची मागणीही केली होती. आता देखील ठाण्यातील (Thane) मानपाडा रेंटल वसाहतीत वीज खंडित करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगलीच समज दिली आहे. कोरोना काळात बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे वीज बील भरण्यासाठी नागरिकांना अजून काही काळाची मुदत द्यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
ठाणे येथील मानपाडा एक्मे रेंटल निवासस्थानातील नागरिकांना पाठवण्यात आलेली मोठ्या रक्कमेची वीज बिले अद्याप भरली गेलेली नाहीत. त्यामुळे महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कापण्यासाठी आले होते. त्यांना मनसेकडून समज देण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी राहण्याची जागेची दुरावस्था आणि विद्युत व्यवस्था सुरक्षित नसल्याचे अधिकाऱ्यांना निर्दशनास आणून दिले. तसंच लॉकडाऊन काळात गेलेली नोकरी यामुळे वाढीव वीज बिलांसंदर्भात सरकारने योग्य निर्णय घ्यावा आणि वीज बिल भरण्यासाठी नागरिकांना पुरेशी मुदत द्यावी. मात्र वीजपुरवठा खंडीत करु नये, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
मनसे कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर वीज कापण्यासाठी आलेले महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी रिकाम्या हाती परतले आहेत. दरम्यान, थकीत वीजबिल भरण्यास मुभा न दिल्यास मनसे स्टाईल शॉक देण्याचा इशाराही मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे. (मनसे कडून मुंबई, पुणे, नाशिक मध्ये वाढीव वीज बिलांविरोधात मोर्चा)
यापूर्वी वाढीव वीज बील माफीसाठी मनसेने राज्य सरकारविरोधात झटका मोर्चा काढला होता. यावेळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.