Raj Thackeray Covid-19 Free: मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त
Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी कोरोनावर मात केली असून त्यांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्याचबरोबर त्यांची आई आणि बहिण  या देखील कोरोनामुक्त झाल्या आहेत. यासंदर्भातील माहिती डॉ. जलील परकार यांनी दिली आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 23 ऑक्टोबर रोजी समोर आली होती. त्यांच्यासोबत त्यांची आई व बहीण यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. आज अखेर या तिघांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. (Raj Thackeray Tested Covid19 Positive: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोविड-19 ची लागण)

राज ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट समोर येण्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुण्यात होणारा मनसेचा कार्यकर्ता मेळावा अचानक रद्द करण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाचे संकट तीव्र असताना राज ठाकरे यांनी कधीही मास्कचा वापर केला नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंंतर आता तरी त्यांनी मास्क वापरावा, अशा चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या.

येत्या काळात प्रमुख महापालिकांच्या निवडणुका असल्याने मनसे मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेले मेळावे रद्द झाले असले तरी आता राज ठाकरे यांची प्रकृती सुधारल्यानंतर लवकरच मेळाव्याची पुढील तारीख, वेळ जाहीर करण्यात येईल.