मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना कोविड-19 (Covid-19) ची लागण झाली आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत असल्याने सध्या त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या आईचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण होऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या बहिणीलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. शुक्रवारी राज ठाकरे यांच्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर आज राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली असून ताप आणि इतर सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.
आज 23 ऑक्टोबर आणि उद्या 24 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुण्यात होणारा मनसेचा कार्यकर्ता मेळावा अचानक रद्द करण्यात आला. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन काल ही माहिती देण्यात आली होती. तसंच मेळाव्याची पुढील तारीख, वेळ लवकरच कळवण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर राज ठाकरे यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती अनेक मीडिया माध्यमातून समोर आली होती. त्यानंतर आज त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजतेय.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. राज्यासह मुंबई शहरातील नव्याने आढळणारे कोरोनाबाधित रुग्णही कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक सेवा सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र संकट पूर्णपणे संपलेले नसल्याने कोरोनाची त्रिसुत्री पाळण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.