
पुणे (Pune) दौऱ्यावर असलेले मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) प्रकृती बिघडल्याने मुंबईला परतले आहेत. त्यामुळे पुण्यात होणारी मनसेची सभा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण जाला आहे. राज ठाकरे यांची सभा पुणे येथे नदीपात्रात होणार होती. पावसाच्या शक्यतेमुळे ही खुल्या मैदानाऐवजी ही सभा बंद सभागृहात घेण्यात येईल अशी माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे हे मुंबईला रवाना झाल्याने आता सभेबाबत तारीख, वेळ आणि ठिकाण हे स्वत: राज ठाकरे यांच्याकडूनच जाहीर केले जाईल, असेही मनसेने स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांची सभा पूर्वनियोजीत वेळेनुसार 21 मे रोजी पुणे येथे नदीपात्रात होणार होती. या सभेसाठी मनसेने जय्यद तयारी केली होती. ऐनवेळी मात्र राज यांची प्रकृती बिघडल्याने ते मुंबईला रवाना झाले. त्यामुळे या सभेबाबत संभ्रम आणि उत्सुकता अशा दोन्ही भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्या आहेत. (हेही वाचा, Sandeep Deshpande, Santosh Dhuri यांच्यावर अटकेची तलवार कायम; जामीनावर सुनावणी 19 मे दिवशी!)
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. त्यांच्या अयोध्या दौऱ्यास भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला आहे. बृजभूषण यांनी राज ठाकरे यांना केवळ विरोधच केला नाही तर त्यांच्यावर एकेरी उल्लेख करत जहरी टीकाही केली आहे. असे असूनही मनसेच्या कोणत्याही नेत्याने त्यावर साधी प्रतिक्रियाही दिली नाही. अपवाद म्हणून पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे बोलले. परंतू, त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन मनसे नेत्यांना कडक शब्दात समज देत म्हटले की, अयोध्या दौऱ्यावरुन प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा शहाणपणा पक्षातील इतर कोणत्याही नेत्याने करु नये. त्यासाठी प्रवक्ते नेमले आहेत.
एकूण रागरंग पाहता राज ठाकरे यांची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. तसेच, महाविकासाघाडीतील नेत्यांकडूनही राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. मनसेला पूरक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्यांनीही काहीशी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.