शिवाजी पार्क पोलिस स्टेशन (Shivaji Park Police Station) मध्ये गुन्हा दाखल असलेले मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी झाली आहे. पण निकाल राखून ठेवण्यात आला आहे. 19 मे दिवशी त्याचा निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे देशपांडे आणि धुरी यांच्यावरील अटकेची तलवार कायम आहे.(हेही वाचा, Loudspeaker Row In Maharashtra: मनसे नेते संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल, शोध सुरु).
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील अनधिकृत भोंग्यांना काढून टाकण्याबाबत सरकारला 4 मेचं अल्टिमेटम दिलं होतं. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी अनेक मनसे कार्यकर्त्यांना अटक केली होती. यामध्ये शिवाजी पार्क परिसरात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला पण हे दोघं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले. काही क्षणात घडलेल्या या प्रकारामध्ये एक ऑन ड्युटी महिला कर्मचारी धक्का लागून पडली. यावरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने मनसेच्या संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
दरम्यान 4 मेच्या दुपारपासून गायब असलेले देशपांडे आणि धुरी अद्याप प्रत्यक्ष समोर आलेले नाही. 4 मेच्या संध्याकाळी एका व्हिडिओ द्वारा देशपांडे यांनी त्यांच्या धक्क्याने किंवा गाडीच्या धक्क्याने महिला कर्मचारी पडली नसल्याचा दावा केला आहे. मात्र गुन्हा दाखल असल्याने अटक टाळण्यासाठी त्यांच्याविरोधात दोघांनीही कोर्टात धाव घेतलेली आहे. 10 मे दिवशी त्यावर सुनावणी झाली होती पण तेव्हाही जामीनावर निकाल देण्यात आला नाही. आजही निकाल देण्यात आला नाही. आता 19 मेच्या सुनावणीमध्ये काय होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.