म्हाडाच्या (MHADA) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8,205 सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सोडतीची जाहिरात 23 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून, 14 ऑक्टोबर 2021 रोजी सोडत काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सोडतीमध्ये समाविष्ट एकूण सदनिकांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 70%, अल्प उत्पन्न गटासाठी 27 % घरे उपलब्ध होतील.
अर्जाची किंमत 560 रुपये (मूळ किंमत 500+60 जीएसटी) असेल. अर्जासमवेत भरावयाची अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गटासाठी 5 हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी 10 हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी 15 हजार रुपये तर उच्च उत्पन्न गटासाठी 20 हजार रुपये इतकी असेल.
प्रवर्ग निहाय उत्पन्न मर्यादा (मासिक) अत्यल्प उत्पन्न गटासाठी 25 हजार रुपये पर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी 25 ते 50 हजार रुपये पर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत तर उच्च उत्पन्न गटासाठी 75 हजार रुपये पेक्षा जास्त अशी असेल. संपूर्ण सोडत पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठीत असून त्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सोडतीमध्ये अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने परतावा करण्यात येईल. (हेही वाचा: Maharashtra Flood Relief: महापूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्र, कोकणासाठी नितीन गडकरी यांच्याकडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर)
या योजनेतून उपलब्ध होणारी घरे ही ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरारोड येथे, पालघर जिल्ह्यातील विरार बोळींज व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आहेत. दरम्यान, राज्यातील एकंदर घरांची मागणी लक्षात घेता तसेच पुणे येथील सोडतीचे यश पाहून म्हाडातर्फे आगामी काळात नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद अशा विभागीय शहरांमध्ये 10 हजार घरांची निर्मिती करण्यात येईल व ही घरे दर्जेदार असतील अशी माहितीही गृहनिर्माणमंत्री डॉ. आव्हाड यांनी दिली.