Maharashtra Flood Relief: महापूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्र, कोकणासाठी नितीन गडकरी यांच्याकडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Nitin Gadkari | (Photo Credits: Facebook)

मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराचा (Maharashtra Flood) फटका बसल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्ते खचले, पूल वाहून गेले तर महामार्गांचेही मोठे नुकसान झाले. हे नुकसान भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने 11,500 कोटी रुपयांची मदत (Maharashtra Flood Relief Package) जाहीर केली आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पश्चिम महाराष्ट्र (Paschim Maharashtra) आणि कोकणसाठी (Konkan) 100 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. गणेशोत्सव काळात मुंबईतून मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय कोकणाकडे जातात. मात्र, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने ते लवकर दुरुस्त करण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी होत होती.

प्राप्त माहितीनुसार, नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या एकूण निधीपैकी 48 कोटी रुपये हे कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी वापरण्यात येतील. तर, उर्वरीत 52 कोटी रुपये हे तात्तपुरत्या आणि तातडीच्या दुरुस्तीसाठी खर्च केले जातील. नितीन गडकरी यांनी ट्विटर च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेला चिपळूण जवळचा वशिष्टी नदीवरच्या पूलाची पावसामुळे दुरावस्ता झाली आहे. हा पूल तातडीने दुरुस्त करुन 72 तासात वाहतुकीसाठी सुरु केला जाईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Flood Relief: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना 11,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर, महाविकासआघाडी सरकारचा निर्णय, पाहा तरतुदी)

नितीन गडकरी ट्विट

नितीन गडकरी ट्वीट

दरम्यान, राज्यात आलेल्या महापूराने अनेक जिल्ह्यांमधील शहरं, गावांचा अतोनात नुकसान केले. प्रामुख्याने या पूराचा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना आणि कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना फटका बसला. या पूराचा फटका बसलेल्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 11,500 कोटी रुपयांचा सहाय्यता निधी म्हणजेच पॅकेज जाहीर केले आहे.