औरंगाबाद पाठोपाठ आता पुण्यामध्येही म्हाडा (MHADA Pune) ने घरांच्या सोडतीची तयारी दर्शवली आहे. दरम्यान पुण्यामध्ये 2908 घरांसाठी येत्या 2 जुलै दिवशी ऑनलाईन सोडत जाहीर केली जाणार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोडत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता आता गर्दी टाळण्यासाठी नगारिकांना सोडत ऑनलाईन देखील पाहण्याची सोय केली जाते. पुण्यामध्ये देखील तशीच सोय असणार आहे. MHADA Lottery Aurangabad 2021 Winners List: औरंगाबाद विभागातील म्हाडा घरांच्या सोडतीतील भाग्यवान अर्जदारांची संपूर्ण यादी इथे पहा!
पुण्याच्या म्हाडाच्या घरांसाठी 14 मे पर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता पण राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता त्याला महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली. सोडतीची तारीख देखील पूर्वी 29 मे होती पण त्याला देखील मुदतवाढ देऊन आता 2 जुलैला निकाल जाहीर होणार आहे. या सोडती मध्ये पुणे सह सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 'म्हाडा'च्या 2153 घरंआणि 20% सर्वसमावेशक योजनेतील 755 घरं अशा एकूण 2908 घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. पण यासाठी तब्बल 57 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत.
कुठे पहाल म्हाडाच्या घरांचा ऑनलाईन निकाल?
दरम्यान म्हाडा कडून ऑनलाईन टेलिकास्ट हे त्यांच्या युट्युब चॅनल वरून केले जाते. सोबतीने निकालाच्या दिवशी संध्याकाळी उशिरा किंवा दुसर्या दिवशी lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील भाग्यवान विजेत्यांची, प्रतिक्षेत असलेल्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. विजेत्यांना एसएमएस द्वारा देखील माहिती दिली जाते.
काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील 5% घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असेल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील म्हाडा सर्वसामान्यांच्या आवाकात येतील अशी घरं बांधण्याच्या विचारात आहे.