Matrimonial Sites करतायत लग्नाळूंची फसवणूक, मुंबई पोलीसांकडून सावधानतेचा इशारा
Matrimonial Frauds | Representational Image. (Photo Credits: Pixabay)

Matrimonial Frauds: ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळांकडून (Matrimonial Sites) लग्नासाठी इच्छूक तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. आजकाल डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने विवाह नोंदणीसाठीही ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जातो. परिणामी अनेक संकेतस्थळे फेक असल्यामुळे लग्नाळूंना चांगलाच गंडा बसतो. त्यामुळे संकेतस्थळांवर नोंदणी करताना काळजी घ्यावी असा इशारा मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) नागरिकांना दिला आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत ट्विट केले आहे.

विवाहनोंदणी संकेतस्थळांकडून केली जाणारी फसवणूक ही प्रामुख्याने आर्थिक असते. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांकडून जबरी शुल्क वसूल करणे. शुल्क भरल्यानंतरही स्थळे दाखविण्यासाठी पुन्हा पुन्है पैशांची मागणी करणे. वैयक्तीक कागदपत्रे मागणे. ती कागदपत्रे मिळाली की, त्या अनुशंघाने पैशांची आणखी मागणी करणे. त्यासाठी मानसिक रित्या त्रास देणे असे प्रकार विवाहनोंदणी करणाऱ्या बोगस संकेतस्थळांकडून केले जातात.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका. ऑलनाईन नोंदणी, मदत घेत असाल तर पटकण कोणावरही विश्वास ठेऊ नका. कोणतीही माहिती देण्यापूर्वी तपशीलांची माहिती घ्या. शक्यतो कोणतीही कागदपत्रे शेअर करणे टाळा. प्रामुख्याने व्यक्तीगत कागदपत्रे देऊच नका. जसे की, आधार, पॅन, ओळखीचे पत्र, मालमत्तेशी निगडीत तपशील-कागदपत्रे देणे कोणत्याही स्थितत टाळा. अनोळखी व्यक्तीशी कोणत्याही प्रकारे आर्थिक बाबींवर बोलू नका.

सोशल मीडयाचा वापर करा

ऑनलाईन माध्यमातून जोडीदार निवडताना सोशल मीडियाचा आधार घ्या. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंकडीन अथवा तत्सम गोष्टींचा वापर करुन जोडीदाराच्या आवडीनिवडी. तपशील जमवा. अशा प्रकारचा तपशील निवडण्यासाठी सोशल मीडिया एक चांगले व्यासपीठ आहे.

स्वतंत्र ईमेल आयडी

ऑनलाईन पद्धतीने संवाद साधताना शक्यतो एक वेगळा ई-मेल आयडी तयार करा. जेणेकरुन तो फक्त अशा प्रकारच्या कामांसाठीच वापरला जाईल. त्या ईमेल आयडीवरुनच नोंदणी, ईमेल संभाषण, चॅटिंग आदी गोष्टींना प्राधान्य द्या. हा ईमेल आयडी इतर कोणत्याही कामासाठी वापरु नका. तुम्ही आगोदरच वापरत असलेला ईमेल आयडी या कामी वापरु नका. जर तुम्ही एखाद्या ईमेल आयडीचा वापर शासकीय कामे, बँकेचे व्यवहार, तुमचा व्यवसाय, व्यक्तीगत कामे आदिंसाठी वापरत असाल तर तो ईमेल आयडी या कामासाठी (ऑनलाईन विवाहनोंदणी) करु नका.

मुंबर्ई पोलीस ट्विट

संशय आल्यास पोलिसांना कळवा

तुम्हाला थोडा संशय जरी आला तरी तातडीने पोलिसांना कळवा. तुमचा संशयसुद्धा तुम्हाला पुढे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवू शकतो. ऑनलाईन संवादातून भेट ठरली तर शक्यतो व्यक्तिगत भेट टाळा. भेटण्यापूर्वी तुमचे मित्र, नातेवाईक, कुटुंबीयांना अथवा जवळच्या व्यक्तींना माहिती द्या. एखादी व्यक्ती सोबत घेऊन जा. ती व्यक्ती तुमच्या भेटीवेळी प्रत्यक्ष अथवा काही अंतरावर उपस्थित असेल याची दक्षता घ्या. एकमेकांना फोटो, व्यक्तीगत माहिती शेअर करणे टाळा. फोन, चॅटींग यांचे रेकॉर्ड सेव्ह करुन ठेवा. ते डिलीट करु नका. फसवणूक झाल्यास त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.