Maharashtra Unlock: महाराष्ट्र अनलॉकमध्ये लग्नसोहळ्यांसाठी काय आहेत नियम? जाणून घ्या
Marriage | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असताना आता राज्यात अनलॉकिंगला (Unlock) सुरुवात झाली आहे. अनलॉक प्रक्रियेत अनेक कडक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील केले जाणार आहेत. यासाठी पाच टप्प्यांमध्ये राज्यातील शहरं, जिल्हे यांची विभागणी करण्यात आली आहे. पॉझिटीव्हीटी रेट (Positivity Rate) आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार हे वर्गीकरण केले आहे. दरम्यान, अनलॉक प्रक्रीयेत लग्नसोहळ्यांसाठी काय आहेत नियम? जाणून घेऊया...

पहिल्या टप्प्यातील शहरं, जिल्ह्यांमध्ये लग्नसोहळ्यांसाठी कोणतेही नियम नसतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये लग्नसोहळ्यांमध्ये 50 टक्के क्षमतेनं सोहळा पार पाडण्याची अनुमती देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठीही 50 टक्के क्षमतेचेच नियम लागू असतील. तर चौथ्या टप्प्यातील लग्नसोहळ्यासाठी 25 उपस्थितांनाच परवानगी देण्यात आली आहे. पाचव्या टप्प्यातील भागांत हे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. लग्नसोहळा फक्त कुटुंबीयांपुरताच मर्यादीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Unlock: महाराष्ट्र अनलॉक! 5 पैकी कोणत्या टप्प्यात काय सुरु काय बंद? घ्या जाणून)

यापूर्वी लग्नसोहळ्यासाठी केवळ 25 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. मात्र आता नियम बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, टप्प्यांनुसारच इतर सेवांमध्येही मुभा देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील शहारांमध्ये अधिक सेवा-सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील शहरांमध्ये काही कमी प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. तर चौथ्या टप्प्यातील शहरांमसाठी अद्याप काही निर्बंध लागू राहणार आहेत.

दरम्यान, राज्यात कालच्या अपडेटनुसार, राज्यात 14,152 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 289 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 1,96,894 सक्रीय रुग्ण आहेत.