महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र शक्तीपीठ’ महामार्ग (Maharashtra Shakti Pitha Highway) तयार होत आहे. राज्यातील पवनार जि. वर्धा ते पात्रादेवी जि. सिंधुदुर्ग ते महाराष्ट्र-गोवा सरहद्द जोडणाऱ्या या ‘महाराष्ट्र शक्तीपीठ’ महामार्गात येणाऱ्या जिल्ह्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी या महामार्गाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पवनार–पात्रादेवी (नागपूर–गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे सादरीकरण करण्यात आले.
राज्यातील तीन शक्तिपीठे, दोन ज्योतिर्लिंग, दत्तगुरुची 5 धार्मिक स्थळे, पंढरपूरसह एकुण 19 तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शीघ्रसंचार द्रुतगती महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन तातडीने पूर्ण करावे. राज्यातील रस्ते दर्जेदार करण्यासोबतच रस्त्यांचा देखभाल व दुरुस्ती खर्च शून्य होण्यासाठी जास्तीत जास्त रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात यावे. यामुळे रस्त्यांचा दर्जा राखला जाऊन पुढील 30-40 वर्ष रस्त्यांच्या कामांवरील खर्चाला आळा बसेल असेही फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ माहूर, तुळजापूर व कोल्हापूर, तसेच मराठीतील आद्यकवी मुकुंदराज स्वामींचे व जोगाई देवीचे अंबाजोगाई, औंढा नागनाथ व परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंगे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर तसेच कारंजा (लाड), अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औंदुबर ही दत्तगुरुंची धार्मिक स्थळेही जोडली जातील. शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यटन, दैनंदिन दळणवळण व औद्योगिक विकास गतीमान होऊन विदर्भ,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभाग एकमेकांना जोडले जाऊन सामान्यांचे जीवनमान उंचावेल. (हेही वाचा: Muslim Woman Reaches Ayodhya On Foot: मुंबईची रामभक्त शबनम शेख पायी चालत पोहोचली अयोध्येत; म्हणाली- 'तिन्ही राज्यांचे पोलीस आणि सरकारने केली मदत')
नागपूर ते गोवा हा सद्य:स्थितीतील 21 तासांचा प्रवास साधारणतः 11 तासावर येईल. तसेच दळणवळण गतीमान झाल्याने परिसराचा विकास नियोजनपूर्वक व वेगाने साध्य करता येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महामार्गाची लांबी 802 किमी असून ढोबळमानाने प्रकल्पाचा भूसंपादनासह खर्च 86 हजार 300 कोटी एवढा अपेक्षित आहे. यासाठी साधारणत: 9385 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.