
राज्यातील तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार लवकरच पोलीस दलातील 18 हजार जागांसाठी भरती (Maharashtra Police Recruitment 2022) प्रक्रिया राबवणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतीच ही घोषणा केली. आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात नुकतीच घोषणा केली होती. त्यानंतर गृहमंत्रालयाकडूनही लागलीच घोषणा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, केद्र सरकारच्या पार्श्वभूमीवर राज्यातही तरुणांना रोजगार दिला जाणार आहे.
केंद्र सरकारने आजपासून दशातील सुमारे 10 लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 75 हजार तरुणांना रोजगार देण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातही त्याच धरतीवर रोजगार योजना राबविण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर विमानतळावरुन प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे केंद्राचे उद्दीष्ट आहे. पहिल्या टप्प्यात 75 हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (हेही वाचा, IRCTC Recruitment 2022: भारतीय रेल्वे मध्ये HRD Joint General Manager पदासाठी नोकरभरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज?)
केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आम्ही रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करत आहोत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना रोजगार देण्याची आमची योजना आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आम्ही पहिल्या टप्प्यात 18 हजार पोलिसांची भरती जाहीर करत आहोत. पुढच्या आठवड्यात त्याबाबत कार्यवाही होईल. आवश्यकता असलेल्या विविध विभागांतील जाहीराती काढल्या जातील आणि नोकरभरती केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.