राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या विविध घटनांमध्ये 1 जूनपासून सुमारे 436 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Maharashtra Rehabilitation Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. यातील 15 मृत्यू हे मागील 3 दिवसांत झालेले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या (Cyclone Gulab) पार्श्वभूमीवर राज्यात झालेला तुफानी पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि यात काहींना आपले प्राण गमवावे लागले. एकूण 436 मृतांपैकी 6 मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक बैठक पार पडली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.
यंदाच्या वर्षी राज्यात अतिवृष्टी झाली आणि यामुळे एका मागून एक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. दरम्यान, 436 मृतांपैकी 196 नागरिकांचा मृत्यू वीज पडून झाला आहे. तर इतर मृत्यूंसाठी पूर, घरं पडणं, दरड कोसळणे, वाहून जाणे आणि पावसासंबंधित इतर दुर्घटना कारणीभूत ठरल्या आहेत. केवळ सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या भागातून 71 मृतांची नोंद झाली. तर 23 जुलै रोजी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण गाव उद्धवस्त झाले. यात 60 हून अधिक लोक जिवंत गाढले गेले. (Mahad, Raigad Landslide: दरड कोसळून उद्धवस्त झालेलं तळीये गाव म्हाडा वसवणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा)
जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण किनारपट्टी, मराठवाडा, विदर्भ येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर आता गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात पूरजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, त्यापूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे सुमारे 86 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे असणार असून कोकण आणि राज्याच्या इतर भागांत 4 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कमी होऊ शकतो. दरम्यान, अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीपासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर 60 किमी -100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी रविवारपर्यंत समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.