Mahad, Raigad Landslide: दरड कोसळून उद्धवस्त झालेलं तळीये गाव म्हाडा वसवणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
MHADA to take up rebuilding of Taliye village (Photo Credits: Twitter)

रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड (Mahad) तालुक्यातील दरड कोसळून उद्धवस्त झालेलं तळीये गाव (Taliye Village) म्हाडा (MHADA) वसवणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी केली आहे. याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. दरड कोसळून बाधित झालेले तळीये गाव पुन्हा वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळण्यास सुरुवात केली आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसंच तळीये गावाचे पूर्नवसन करण्याची सूचना शरद पवार यांनी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (CM Uddhav Thackeray Mahad Visit: डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन करणार; तळीये करांनाही मदतीचं आश्वासन)

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती."

Jitendra Awhad Tweet:

राज्यात मागील 4-5 दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधील महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता दरड कोसळण्याची घटना घडली. दरड कोसळल्यानंतर सुमारे 100 फुटांवरुन मोठे दगड गावातील घरांवर पडले. मात्र आपत्तीजन्य वातावरणामुळे बचाव दल तेथे पोहचू शकले नाही. शुक्रवारी सकाळी NDRF ची टीम मदतीसाठी गावात दाखल झाली. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली. मात्र मुसळधार पाऊस आणि पुरपरिस्थिती यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. या दुर्घटनेत एकूण 49 जणांचा मृत्यू झाला असून अजून 47 जण बेपत्ता आहेत. दरम्यान, या गावात 45 घरं असून एकूण लोकसंख्या 120 इतकी होती.