Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Gram Panchayat Election 2021: राजकीय आखाड्यात एकमेकांना डाव दाखवण्याच्या खटाटोपात आपण काय करतो आहोत याचे भानच काहींना राहात नाही. आशाच काहीशा प्रकारातून ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) चक्क 75 वर्षीय उमेदवाराचे अपरहण (Kidnapping) घडल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर संबंधित उमेदवाराला दबाव टाकून उमेदवारी अर्ज माघेही घ्यायला लावल्याचे पुढे आले आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) पेठ ग्रामपंचायत (Peth Gram Panchayat Election) निवडणुकीदरम्यान घडली. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, रामभाऊ सर्वेलाल पवार (वय 75 रा. पेठ) असे अपरहण करण्यात आलेल्या उमेदवाराचे नाव आहे. बाल्या बावणे, दीपक करवा, पुरूषोत्तम सोनवणे (सर्व रा. पेठ) या तिघांनी मिळून रामभाऊ पवार यांचे अपहरण केले असा आरोप आहे. सध्या तिघांनाही अटक झाली आहे. रामभाऊ पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पेठ ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. त्यानुसार इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 4 जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिवस होता. दरम्यान, याच दिवशी सकाळी 10 वाजणेच्या सुमारास बाल्या, दीपक, पुरूषोत्तम व मनोहर येलेकर (रा. धामना) या चार आरोपींनी रामभाऊ यांचे अपहरण केले. त्यासाठी त्यांना जबरदस्तीन कारमध्ये बसवले. तसेच, त्यांना तहसील कार्यालयात नेऊन त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. अर्ज मागे घेतल्यावर रामभाऊ पवार यांना परत पेठ येथे सोडण्यात आले. पेठ येथे परतल्यावर पवार यांनी चौघांविरुद्ध हिंगणा पोलिसांत तक्रार दिली. (हेही वाचा, Gram Panchayat Election 2021: राज्यातील सरपंचपदाच्या लिलावावरून निवडणूक आयोगाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश)

रामभाऊ पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी विविध कलमांन्वये बाल्या बावणे, दीपक करवा, पुरूषोत्तम सोनवणे (सर्व रा. पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांची जामीनावर सुटकाही झाली आहे.